सिंधुदुर्ग : नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर प्रवासी संघटनेचे उपोषण मागे | पुढारी

सिंधुदुर्ग : नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर प्रवासी संघटनेचे उपोषण मागे

सांवतवाडी, पुढारी वृत्तसेवा : सांवतवाडी रेल्वे स्थानकाचे काम जलद गतीने व्हावे, रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी आज (दि.२६) कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र आमच्या मागण्या मान्य न झाल्यास २३ फेब्रुवारीपासून याच ठिकाणी ‘आमरण उपोषण’ छेडणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांनी दिली.

सावंतवाडी प्रवासी संघटनेने आज आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. माजी आमदार राजन तेली यांनी आज सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांना फोनवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद करून दिला. यावेळी सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, म्हणून रेल्वेमंत्र्यांची फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात भेट घालून देतो, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या मध्यस्थीने दिले. प्रा मधू दंडवते यांच्या नामकरणाबाबत मी आत्ताच आश्वासन देऊ शकत नाही. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

हेही वाचा :

Back to top button