सिंधुदुर्ग: आंबोलीतील जमिनींवरील परप्रातीयांचे अतिक्रमण ग्रामस्थांनी हटविले | पुढारी

सिंधुदुर्ग: आंबोलीतील जमिनींवरील परप्रातीयांचे अतिक्रमण ग्रामस्थांनी हटविले

आंबोली, पुढारी वृत्तसेवा : आंबोली परिसरात विविध ठिकाणी मूळ ग्रामस्थांच्या जमिनींवर परप्रातीयांनी केलेले अवैध अतिक्रमण ग्रामस्थांनी आज (दि.३१) काढून टाकले. या मोहिमेत शेकडोंच्या संख्येने महिलांनी पुढाकार घेतला. राजकीय वरदहस्ताने आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आंबोलीतील अनेक जमिनींची खरेदी- विक्री झाली आहे, याची संबंधित यंत्रणेकडून कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आंबोली ग्रामपंचायतीवर धडक देत परप्रांतीयांना परस्पररित्या अमुक – तमुक नावाखाली घर नंबर देवू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, आंबोली – चौकुळ व गेळे या गावांमध्ये पुरातन मूळ ग्रामस्थांच्या जमिनी कबुलायतदार गावकार नावे कर पद्धतीने येत असत. त्या सर्व जमिनी त्या-त्या गावातील मूळ रहिवाशी यांच्या मालकीच्या सातबारावर वर्ग १ पद्धतीच्या होत्या. मात्र, १९९९ साली एका रात्रीत ग्रामस्थांच्या जमिनींच्या सातबारावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख लावण्यात आला. याबाबत ग्रामस्थांचा न्यायालयीन लढा व महाराष्ट्र शासन यांच्यासोबत लढा चालू आहे. तर दुसरीकडे राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती, परप्रांतीय व्यक्ती यांच्यासह काही तथाकथित संस्था आणि काही अवैध काम करणाऱ्यांनी या जमिनी आपल्या नावावर लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या मूळ ग्रामस्थांची कुटुंबे ही भूमिहीन झाली आहेत. ते स्वत:च्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देत आहेत. मात्र, आता आंबोली ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आंबोली परिसरातील जमिनींची सखोल चौकशी झाल्यास सर्वांत मोठा जमीन घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

Back to top button