Ratnagiri : राजापूर- बिबट्याने पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातून कुत्र्याला उचललं | पुढारी

Ratnagiri : राजापूर- बिबट्याने पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातून कुत्र्याला उचललं

राजापूर /पुढारी वृत्तसेवा : गेले काही दिवस राजापूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. बुधवारी (दि.२४) मध्यरात्री राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातून बिबट्याने एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. तर झालेल्या झटापटीत रक्ताचे डाग त्या व्हरांड्यात पहायला मिळाले. दरम्यान, त्या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांंमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ratnagiri)

गेले काही दिवस राजापूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. माहितीनुसार, बुधवारी (दि.२४) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास चार पाच कुत्र्यांचा पाठलाग करीत बिबट्या अचानक पोलीस ठाण्याच्या मागील बाजुने आत घुसला. चपळाईने आत घुसलेल्या बिबट्याने एका बाजुला घुसुन एका कुत्र्याला पकडले आणि त्याला उचलून घेवून तो तुरुंगाच्या दिशेने असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजुने पसार झाला. हा प्रकार राजापूर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने पोलीस कर्मचाऱ्यात काहीसे चिंतेचे वातावरण पहावयास मिळाले.

राजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या वेळी ड्युटीवर कार्यरत असतात. काही कर्मचारी रात्रीची ड्युटी उशिरा संपल्यामुळे तेथेच मुक्कामी असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अहोरात्र जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या
Back to top button