Satish Lalit : मातृदेवता संकल्पनेचा माग कातळशिल्प प्रतिमांमध्ये आढळतो : सतीश लळीत | पुढारी

Satish Lalit : मातृदेवता संकल्पनेचा माग कातळशिल्प प्रतिमांमध्ये आढळतो : सतीश लळीत

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा : अश्मयुगीन काळातील संभाव्य मातृसत्ताक पद्धती आणि मातृदेवतेच्या संकल्पनेचा माग कातळशिल्पांमधील काही प्रतिमांमध्ये आढळून येतो, असे प्रतिपादन कातळशिल्प अभ्यासक व रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आजीव सदस्य सतीश लळीत यांनी कोटा (राजस्थान) येथे राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत केले. Satish Lalit

रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची २६ वी तीन दिवसीय राष्ट्रीय पुरातत्व परिषद कोटा येथे झाली. कोटा येथील जय मिनेश आदिवासी विश्वविद्यालयाने या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत लळीत यांनी आपला शोधनिबंध सादर करुन सादरीकरण केले. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला व यादृष्टीने अधिक अभ्यास होण्याची अपेक्षा व्यक्त केली. Satish Lalit

परिषदेचे उद्घाटन भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे माजी महासंचालक डॉ. राजेश तिवारी यांच्याहस्ते झाले. यावेळी जय मिनेश आदिवासी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. पी. तिवारी, अध्यक्ष आर. डी. मीना, रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. गिरीराज कुमार, महासचिव दिबिशादा गरनायक, अलाहाबाद विद्यापीठाचे माजी प्राचीन इतिहास विभाग प्रमुख प्रा. यु. सी. चट्टोपाध्याय उपस्थित होते.
आपल्या सादरीकरणात लळीत म्हणाले की, कातळशिल्पांचा नेमका कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, ती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसपु २० हजार ते ५ हजार वर्षे) या काळात खोदली गेली असावीत, असा अंदाज करता येतो. या काळात मानव भटका संकलक शिकारी (हंटर गँदर) अवस्थेत होता. त्याला पशुपालन व शेतीचे ज्ञान नव्हते. तो टोळ्यांनी राहत असे.

या टोळ्या मातृसत्ताक होत्या, असे एक मत आहे. टोळी किंवा कबिल्याची प्रमुख ज्येष्ठ महिला असे. स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या सर्जनशक्तीमुळे तिला हे मानाचे स्थान प्राप्त झाले असावे. हळूहळू तिला पूजनीय स्थान मिळाले. यातूनच पुढच्या काळात मातृदेवतेच्या संकल्पनेचे बीज रोवले गेले. सुफलनाच्या शक्तीला वंदन करणारी ही संकल्पना उन्नत होत. तिचे रुपांतर आधुनिक काळात लज्जागौरीमध्ये आणि पुढे आजच्या देवी परंपरेमध्ये झाले. आजही भारतासह अनेक देशांमध्ये स्त्रीला माता किंवा देवी मानण्याची प्रथा आहे, असे लळीत यांनी मांडले.

लळीत पुढे म्हणाले की, कातळशिल्पांमधील काही प्रतिमांचा अभ्यास करताना या परंपरेचे आदिम रुप आपल्याला आढळून आले. विशेषतः खोटले येथील एका प्रतिमेचे लज्जागौरीशी विलक्षण साम्य आहे. कुडोपी येथील एक कातळशिल्पही बाळासह आईचे असल्याचा तर्क बांधता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील चवे-देवूद येथील एक प्रतिमा मातृदेवतेचे आदिम रुप आहे, असे मानायला पुष्कळ वाव आहे. याशिवाय दाभोळे पोखरबाव, वानिवडे (सिंधुदुर्ग), निवळी, रुंधेतळी (रत्नागिरी) येथे कमरेपासून खालील शरीराची कातळशिल्पे (टु लेग्ज फिगर) आढळली आहेत. ही कातळशिल्पे नक्षीकाम केलेली व घाटदार आहेत. यावरुन त्या स्त्रीशी संबंधित प्रतिमा असाव्यात, असा अंदाज बांधता येतो.

कातळशिल्पांचा अर्थ लावणे हे अत्यंत जटील काम असल्याचे सांगून लळीत म्हणाले की, केवळ तर्क, अंदाज आणि अन्य ठिकाणच्या प्रतिमांशी असलेले साधर्म्य लक्षात घेऊन अर्थान्वयाचा प्रयत्न करता येतो. याच अंगाने काही प्रतिमा या मातृदेवतेच्या संकल्पनेचे आद्य रुप असावे व पुढील काळात ही संकल्पना अधिक उन्नत झाली असावी, असा निष्कर्ष मी माझ्या शोधनिबंधात काढला आहे.
कोटा येथील या परिषदेत राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यातील संशोधक व पुरातत्व विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button