निळ्या देवमाशाचे निळे हुंकार : अखेर ‘ते’ देवमाशाचे पिल्लू समुद्रात पोहोचले

निळ्या देवमाशाचे निळे हुंकार : अखेर ‘ते’ देवमाशाचे पिल्लू समुद्रात पोहोचले

गणपतीपुळे येते समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (११ नोव्हेंबर) एक देवमाशाचे पिलू वाहून आले होते. या पिलाची लांबी ३० फूट तर वजन साडेतीन टन इतके होते. या पिलाला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तटरक्षक दल, वनविभाग, पर्यावरणप्रेमी संस्था यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी (१४ नोव्हेंबर) समुद्रात सोडण्यात आले. त्याचा हा घटनाक्रम. (blue whale ganpatipule)

—————————————————————————————————————————-

किनाऱ्यावर आलेल्या देवमाशाची अखेर खोल समुद्रात सुटका झाली. हे निळ्या देवमाशाचं पिल्लू होतं. परवा सकाळी ते गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर आलं. त्यानंतरचे दोन दिवस त्याने किती धीराने काढले होते !

इनमिन पाचसहा महिन्यांचं पिल्लू… आईपासून ताटातूट झालेलं… अथांग सागरामध्ये दिशा हरवलेलं… श्वास घेतानाचा त्याचा हुंकार त्याच्या जगण्याची आशा जागवत होता. त्याच्या निळ्या पापण्यांच्या डोळ्यांत अपार करुणा होती. एरव्ही त्याचा भलामोठा जबडा वासून त्याने सगळ्यांची दाणादाण उडवली असती पण आत्ता मात्र डोक्यावर शांतपणे थोपटून घेत होतं… त्याच्या मऊसूत, गार कांतीला स्पर्श करताना माया जाणवत होती…

किनाऱ्यावर आलेला हा ब्लू व्हेल म्हणजे निळा देवमासा. हा महासागरातलाच नव्हे तर पृथ्वीवरचा सर्वात मोठा प्राणी आहे ! हे सुद्धा होतं पिल्लूच पण त्याचाच वारसदार. हे लांबच्या लांब ! बुलेट ट्रेनसारखा दिसणारा जबडा ते कल्ले आणि मग शेपटीपर्यंत चांगलं 30 फूट होतं आणि वजनालाही साडेतीन टनापर्यंत.

त्याच्या बचावकार्यामध्ये वापरलेले बेल्ट एरव्ही हत्तीच्या सुटकेसाठी वापरले जातात. पण या दोरांपुढेही ते एवढंसं भारी पडत होतं !

देवमाशाचं हे पिल्लूच जर इतकं मोठं आहे तर त्याची आई किती महाकाय असेल…या विचारानेच अचंबित व्हायला होत होतं सगळ्यांना. देवमासे 80 ते 100 वर्षं जगू शकतात आणि पूर्ण वाढलेल्या देवमाशाचं वजन 200 टनांपर्यंत भरू शकतं!

देवमासे समुद्रात राहात असले तरी ते सस्तन प्राणी आहेत, हे मासे अंडी घालत नाहीत. ते पिल्लांना जन्म देतात आणि इतर सस्तन प्राण्यांसारखंच पिल्लांचं पालनपोषण करतात.

देवमाशाच्या पिलाला समुद्रात पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते.
देवमाशाच्या पिलाला समुद्रात पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते.

भूक लागली की आईच्या पोटापाशी घोटाळणारं देवमाशाचं पिल्लू पाहिलं की गायवासराचं आठवण होते. म्हणून तर देवमाशाच्या पिल्लाला Calf म्हणजे वासरू म्हणतात.

देवमाशाचा नर पिल्लासोबत नसतो. त्यामुळे समुद्रामध्ये आई आणि पिल्लू अशी देवमाशाची जोडी पाहायला मिळते. या काळात पिल्लू जरा जरी दूर गेलं तरी स्ट्रेस सिग्नल देतं. हे आवाज ऐकून आई पिल्लाचा माग काढते.

देवमाशांची दृष्टी फार प्रभावी नसते. पण त्यांची श्रवणक्षमता तीव्र असते. देवमासे वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात. ते आवाजही वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप मोठे असतात !

किनाऱ्यावर आलेल्या या पिल्लाचा आवाज त्याच्या आईपर्यंत पोहोचत नव्हता. त्या काळात या पिल्लाच्या निळ्या आईने त्याला शोधलं असेल का … कसं शोधलं असेल… पिल्लाच्या काळजीनं तिचं काळीज धास्तावलं असेल का … असे अनेक प्रश्न मनात येत होते. पण त्याची उत्तरं अथांग समुद्रालाच माहीत होती…

हे महाकाय निळे देवमासे आपण कधीतरी फोटोत, नॅशनल जिओग्राफिकच्या डाॅक्युमेंटरीमध्येच पाहिलेले असतात. फेसाळत्या समुद्रात ते भलीमोठी उसळी घेतात… श्वास घेताना पाण्याचा मोठ्ठा फवारा सोडतात … हे सगळं आपण पाहिलेलं असतं. या पिल्लू देवमाशालाही मोठ्ठं होऊन असंच दिमाखात जगायचं आहे पण आत्ता ते जीवनमरणाच्या हिंदोळ्यात अडकलं आहे… हे दृश्यंच फार करुणामय होतं.

भरतीचं पाणी चढू लागलं की किनाऱ्यावरचे जीवरक्षक एकच जोर लावून त्याला समु्द्रात ढकलत… पण हा देवमासा पुन्हा लाटांसोबत किनाऱ्यावर येई… भरती सरून गेली की ओहोटपाण्यात त्याला तगवून ठेवावं लागे.

पांढऱ्या ओल्या कापडात गुंडाळलेलं हे पिल्लू कधी एकदा त्याच्या जगात जाईल आणि त्याच्या आईला भेटेल … या भावनेने जीव कासावीस होई. आपला श्वास अडकून पडे, काळजात धस्स होई… पण समुद्राच्या लाटांवर त्याने छान शेपटी हलवली आणि त्याचा तो पाण्याचा फवारा मारणारा श्वास घेतला की खूप हायसं वाटे…

इकडे गावात दिवाळीची धामधूम. सुट्यांचा हंगाम असल्याने पर्यटकांचीही झुंबड. सगळेजण त्यांच्या खातिरदारीत असले तरी किनाऱ्यावरच्या या पाहुण्याकडेच लक्ष लागलेलं. बरेच पर्यटक त्यांची मौजमजा विसरून व्हेलच्या या पिल्लापाशी येऊन बसले होते. त्याला दिलासा देण्यासाठी काम करणाऱ्यांना मदत करत होते…

जगू दे रे बाबा हे पिल्लू … त्याला त्याची आई भेटू दे… गेलं का समुद्रात … ?

दूरची माणसंही दिवाळीची गडबड विसरून याचं पिल्लाच्या काळजीत गढली होती.
सोशल मीडियावरून अपडेट घेत होती…प्रश्न विचारत होती…

दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याहून 'रेस्क्यू' संस्थेची टीम आली…टीममधल्या अनुभवी डाॅक्टरने पिल्लाला गोंजारलं, शक्ती वाढवणारे बूस्टर डोस दिले… सलाईन लावलं…तेव्हा कुठे पिल्लाच्या जीवात जीव आला… ते पुन्हा समुद्रात जाण्याची आस निर्माण झाली.

तटरक्षक दलाचा ताफा आला, वनविभागाची वाढीव कुमक आली… एक हेलिकाॅप्टर भिरभिरत पाहणी करून गेलं. देवमाशाचं हे लहानगं पिल्लू सारा थरार अनुभवत होतं. कल्ल्यांची हालचाल करून जगण्याची हिंमत वाढवत होतं !

काल रात्री पुन्हा भरती येण्याआधी समुद्रात मोठी बोट तैनात करण्यात आली.तिच्याभोवती तटरक्षक दलाच्या आणखी दोन बोटी होत्या….

हळूहळू भरतीच्या लाटा वाळूत पहुडलेल्या देवमाशापर्यंत येऊ लागल्या. पिल्लू समुद्रात जाऊ शकत नव्हतं. म्हणून समुद्रच त्याच्यापर्यंत आला होता !

तटरक्षक दल आणि वनविभागाच्या मोठ्या फौजेनं पिल्लाला बेल्टने उचललं आणि बोटीच्या दिशेने नेलं. ते बघून मला मुंबईच्या समुद्रात पहाटे होणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची आठवण झाली. तराफ्यावर स्वार होऊन गणराया जसा समुद्रात विलीन होतो तशीच या पिल्लाचीही सागरप्रवेशाची मिरवणूक होती ती !

बोटीने त्याला बेल्टने ओढायला सुरुवात केली आणि उसळत्या लाटा अंगावर येऊ लागल्या तशी या पिल्लानेही जोरदार उसळी घेतली. त्याने त्याची शेपटी जशा आवेशात हलवली त्यावरून देवमाशाच्या ताकदीचं दर्शन घडलं. किनाऱ्यावर शांतपणे पडून राहिलेलं हे पिल्लू आता खऱ्या अर्थाने जिवंत झालं होतं !

देवमाशाचं हे पिल्लू समुद्राच्या स्वाधीन झालं तेव्हा कुठे किनाऱ्यावरची गजबज शांत झाली…आता समुद्रात ते वाचेल का ही चिंता होतीच पण त्याला त्याच्यात्याच्या विश्वात पोहोचवल्याचा दिलासाही होता…

'माणसांचं काळीज इतकं ओलं आहे यावरच जगण्याची उमेद आहे! '

एका मित्राने माझ्या सोशल मीडिया अपडेटवर कमेंट केली…खरंच ! एवढ्या दुरून त्याने सगळ्यांच्या मनातल्या भावना किती अचूक मांडल्या होत्या !

निळा देवमासा पुन्हा समुद्रात गेल्याची बातमी पाहून सगळेच सुखावले होते. या पिल्लासाठी प्रार्थना करत होते. पिल्लू त्याच्या आईला भेटेल का… असं विचारून काळजी करत होते…

आॅपरेशन ब्लू व्हेल आत्तातरी संपलं होतं. आता उद्या सकाळी पुन्हा या देवमाशासाठी समु्द्रावर यावं लागू नये एवढंच मनात येत होतं.

किनाऱ्यावरून परतताना लाटांची घनगंभीर गाज घुमत होती… अशी कितीतरी रहस्यं जपणाऱ्या समु्द्राकडे पाहताना भरून येत होतं आणि चंदेरी लाटांवर चमकणारं आयुष्याबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढलं होतं.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news