रायगड : ३२१ गडकिल्ल्यांची सायकल सफर करणारा केरळचा शिवभक्त | पुढारी

रायगड : ३२१ गडकिल्ल्यांची सायकल सफर करणारा केरळचा शिवभक्त

महाड, पुढारी वृत्तसेवा: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होऊन केरळ येथील ३२ वर्षीय शिवराज गायकवाड यांनी मागील १७ महिन्यांपासून महाराष्ट्रातील ३२१ किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. आज (दि.११) महाड परिसरातील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी आला असता शिवप्रेमी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ६ जून २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाच्या पूर्ततेच्या दिवशी किल्ले रायगडावर या सफरीचा तो समारोप करणार आहे.

दोन दिवसांपासून महाड परिसरामध्ये किल्ल्यांना भेटी देणाऱ्या एम. के. हमरास (शिवराज गायकवाड) यांच्याशी प्रवासासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांनी व इतिहासाने प्रेरित होऊन महाराजांच्या तीनशेहून अधिक गडकिल्ल्यांची प्रत्यक्ष भेट देऊन दर्शन घेतल्याचे नमूद केले.

शिवराज हे पेशाने ड्रायव्हर असून ते काही काळ परदेशात नोकरी करीत होते. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तरुणाने प्रसारमाध्यमांवर छत्रपती शिवरायांचे चरित्र व  ऐतिहासिक गडकिल्ल्यांची  माहिती पाहिली आणि  ते खूप प्रभावित झाले. तेव्हापासून सर्व गडकिल्ले सायकल सफर करून  पाहण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला.

त्यानुसार १ मे २०२२ पासून  केरळमधून या मोहिमेस सुरुवात करत कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत त्यांनी सर्वप्रथम किल्ले प्रतापगडाचे दर्शन घेत या मोहीमेस सुरुवात केली. त्यावेळी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांनी देखील या तरुणाच्या ध्येयाचे विशेष कौतुक करून त्याच्या मोहिमेस शुभेच्छा देऊन  विशेष सहकार्य केले.

आत्तापर्यंत जवळपास १७ हजार किलोमीटर सायकल प्रवास करून त्यांनी ३२१ गडकिल्ल्यांचे दर्शन घेतले आहे. बुधवारी महाड येथे आले असताना त्यांनी सोनगड या गडाचे दर्शन घेतले. यानंतर उर्वरित ५० गडकिल्ले पाहण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तेथून मार्गक्रमण केले. या मोहिमेची सांगता स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचे दर्शन घेऊन करण्यात येईल. येत्या जून महिन्यातील राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने त्यांची ही  ध्येयपूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

तसेच या सफरीदरम्यान अनेक शिवकालीन बुरुज, तटबंदी, छोट्या मोठ्या वास्तू या अजूनही अनभिज्ञ आहेत. याबाबत त्याची नोंद व माहिती  परिसरातील ग्रामस्थांना नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याच्या काही नोंदी आपण ठेवल्या असून येणाऱ्या काळामध्ये  या नोंदी महाराष्ट्र सरकारच्या  पर्यटन व पुरातत्त्व विभागास देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

महाड येथे सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे डॉ. राहुल वारंगे, कोकण कडा मित्र मंडळाचे सुरेश पवार, माधव डाखवे, महेश मोरे, सिद्धेश मोरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ, माजी शिक्षिका बागडे, संकेत शिंदे आदीसह शिवभक्त व नागरिकांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.

हेही वाचा 

Back to top button