सिंधुदुर्ग: तळेरे येथे मायनिंग प्रकल्पाबाबत खेळीमेळीत जनसुनावणी

सिंधुदुर्ग: तळेरे येथे मायनिंग प्रकल्पाबाबत खेळीमेळीत जनसुनावणी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : दोन सत्रात जनसुनावणी झाली. मात्र, जनसुनावणी कशी असावी, तर कासार्डे गावासारखी असावी. कोणताही वाद न करता खेळीमेळीने सुसंवाद साधून, म्हणणे ऐकूण घेऊन कोणावरही दबाव न टाकता झालेली जनसुनावणी एक आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले.

तळेरे येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मे. महाराष्ट्र मिनरल्स कार्पोरेशन लिमिटेड व मे. कासार्डे को. ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या उत्पादन क्षमता, खाण लिज कालावधी वाढविणे, वाळू उत्खनन, क्रशिंग व वॉशिंग प्रकल्पाच्या पर्यावरण जनसुनावणीत ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळूंखे, रत्नागिरी उपप्रादेशिक अधिकारी राहुल मोरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी व्ही.बी. साळवे, सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते, तलाठी ए. आर आम्रजकर, कोतवाल दीपक आरेकर, तंटामुक्त अध्यक्ष संजय नकाशे,  महाराष्ट्र मिनरल्सचे मेजर नाईक, मायनिंग सोसायटी चेअरमन नामदेव बांदिवडेकर, सर्व ग्रा.पं.सदस्य,  लोकप्रतिनिधी, उद्योजक, नागरिक यांच्यासह शासन, रत्‍नागरी, कोल्हापूर प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र मिनरल्स, मायनिंग सोसायटी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रकल्पाचे फायदे व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचे सादरीकरण

तत्पूर्वी महाराष्ट्र मिनरल्स कार्पोरेशन लिमिटेड व मे. कासार्डे को. ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या उत्पादन क्षमता, खाण लिज कालावधी वाढविणे, वाळू उत्खनन,  क्रशिंग व वॉशिंग प्रस्तावित विस्तारासाठी झालेल्या प्रकल्पाच्या पर्यावरण जनसुनावणी दरम्यान प्रकल्पाचे फायदे व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले.

पहिल्या सत्रात सिलिका वाळू उत्खनन आणि वॉशिंग उत्पादन क्षमता ३ लाख टन प्रतिवर्षावरुन ४ लाख ५० हजार करणे, खाण लीज कालावधी वाढविणे या प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक सुनावनीस सुरवात झाली. अमोल जमदाडे, सुरेश कराळे, संजय पाताडे, रविंद्र पाताडे, प्रकाश तिर्लोटकर, संतोष कानडे, दिलीप तळेकर, संजय पाताडे, बाबुभाई पेडणेकर, गणेश पेडणेकर यांनी आपल्या सूचना अधिकाऱ्यांसमोर मांडले.

 कासार्डे गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा

पर्यावरण, पाणी, रस्ता, सांडपाण्याचा पुर्नवापर करावा, यासाठी नियोजन तसेच प्रकल्प भागात येणाऱ्या शिवगंगा, पियाळी नदीचे पाणी बाधित होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जस्तीत जास्त वृक्षारोपण करणे, स्थानिकांना रोजगार देणे, खनिज कर्म निधीचा वापर कासार्डे गावासाठी करण्याबाबत प्रस्ताव पाठवणे, आदी ठरविण्यात आले.

तर दुपारच्या सत्रात झालेल्या मे. कासार्डे को. ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या  सिलिका वाळू उत्खनन, क्रशिंग आणि वॉशिगच्या  प्रस्तावित विस्तारासमवेत उत्पादन क्षमता दीड लाख टन प्रतिवर्षावरुन ४ लाख ५० हजार ५५१ करुन विस्तार वाढविणे, या प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक सुनावणी करून प्रकल्पाचे सादरीकरण झाले.

ग्रामस्थांचा एकमुखी मायनिंगला पाठिंबा

सरपंच निशा नकाशे, रविंद्र पाताडे, रिध्दी मुणगेकर, संजय पाताडे, संतोष कानडे, प्रकाश तिर्लोटकर, अमोल जमदाडे, प्रविण पाताडे, पूनम शेटये, संजय देसाई, संजय संभाजी पाताडे, प्रकाश पारकर यांनी प्रकल्पाबाबत बाजू मांडताना रोजगार निर्मितीसह प्रदूषण, पर्यावरणातील बदल त्याचा होणारा परीणाम याबत मुद्देसूद मांडणी केली. कंपनीच्या माध्यमातून स्थावर मालमत्ता, महिला रोजगार, शासनाच्या अटी शर्ती, पाणी स्त्रोत, कुंपण, विनाशकारी कोणताही प्रकल्प येणार नाही, याची खात्री देण्याबराबर कासार्डेतील मायनिंगचा इतिहासाचे कथन करण्यात आले. दोन्ही कंपन्यांचा कासार्डेसह परिसरातील रोजगारांसह विकासात वाटा असल्याचे सांगत ग्रामस्थांनी एकमुखी मायनिंगला पाठिंबा दिला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news