युवतीवर सुरीने हल्ला करून स्वत:ला जखमी केलेल्या युवकाचा मृत्यू | पुढारी

युवतीवर सुरीने हल्ला करून स्वत:ला जखमी केलेल्या युवकाचा मृत्यू

दोडामार्ग ; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण गोव्याच्या जिल्हा रुग्णालय परिसरात एका युवतीवर सुरीने हल्ला केला व नंतर पुन्हा स्वतःवर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या आंबडगाव येथील परशुराम गणपत गवस (वय 21) या युवकाचा मंगळवारी गोमॅकोत सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. या युवकाच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

आंबडगाव-देऊळवाडीमधील परशुराम हा डिचोली-गोवा येथील एका कुरियर कंपनीत काम करीत होता. सोमवारी गोव्यातील मडगाव-फातोर्डा येथील एका रुग्णालयाजवळील मुख्य रस्त्यावर एका युवतीसोबत परशुराम भांडत होता. या भांडणात त्याने युवतीवर सुरीने हल्ला करून स्वतःला देखील संपविण्याचा प्रयत्न केला होता. तेथून जाणार्‍या पोलिस कर्मचार्‍याने हा सर्व प्रकार पाहिला व प्रसंगावधान राखत परशुरामच्या हातातील चाकू काढून घेतला.

दरम्यान दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान परशुरामचे मंगळवारी सकाळी निधन झाले. शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

परशुराम याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. शिवाय शेती नसल्याने त्याचे वडील मोलमजुरी करून घरचा प्रपंच चालवत होते. परशुराम हा देखील डिचोली येथील कुरियर कंपनीत कामास होता. त्यामुळे त्याचा देखील कुटुंबाच्या प्रपंचात मोठा हातभार लागायचा. मात्र, त्याच्या निधनाने कुटुंबातील कमावती व्यक्‍तीच गेल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आई, बाबांना देखील मोठा धक्‍काच बसला आहे.

Back to top button