मालेगावात रिक्षाचालकावर गोळीबार; हल्‍लेखोर ताब्‍यात | पुढारी

मालेगावात रिक्षाचालकावर गोळीबार; हल्‍लेखोर ताब्‍यात

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा

शहरातील कुसुंबा रोडवर (सोमवारी) रात्री रिक्षाचालकावर गोळीबार झाला. सुदैवाने तो या हल्‍ल्‍यात बचावला. पोलिसांनी वेगात शोध घेत हल्लेखोराला पकडले. या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षाचालक अशपाक शहा मुक्तार शहा (वय २५, रा. संजरी चौक) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, अशपाक हा नवीन बसस्थानकाकडून कुसुंबा रोडने जात होता. अवलिया मशीदीजवळ सय्यद इरफान, सय्यद इस्माईल उर्फ इरफान काल्याने आवाज देऊन त्याला थांबवले. काल्याचा भाऊ सय्यद इस्राईल सय्यद इस्माईल व मुम्मू (पूर्ण नाव माहित नाही) हे देखील जवळ आले.

त्यांच्यात बाचाबाची झाली. तेवढ्यात इरफान काल्याने कमरेला लावलेली गावठी पिस्तूल काढून गोळीबार केला. अशपाकने प्रतिकार करून पळ काढल्याने तो बचावला.‌ तरी तो जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तपास चक्र फिरवत इरफान काल्याला ताब्यात घेतले आहे.

Back to top button