सिंधुदुर्ग: दोडामार्ग-विजघर राज्यमार्ग मुळस येथे खचला

सिंधुदुर्ग: दोडामार्ग-विजघर राज्यमार्ग मुळस येथे खचला

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग-विजघर राज्यमार्गाला मुळस येथे मधोमध भगदाड पडले आहे. शिवाय तेथील रस्ता पूर्णतः खचत चालला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती होणे आवश्यक आहे. अन्यथा अपघात होण्याची व परिणामी या राज्यमार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

तालुक्यातील राज्यमार्गांना लागलेले ग्रहण सुटण्याचे चिन्हच दिसत नाही. दोडामार्ग-विजघर राज्यमार्ग हा जणू मृत्यूचा सापळा बनतो की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय हा राज्यमार्ग मुख्यत्वे करून गोवा-बेळगाव व कोल्हापूर असा जातो. तसेच गोव्याला जाण्यासाठी हा राज्यमार्ग अतिशय जवळचा असल्याने दक्षिण भारतातील पर्यटक या राज्यमार्गाचा अवलंब करतात.

परिणामी या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. या राज्यमार्गाची ठिकठिकाणी बाजूपट्टी नसल्याने अनेक अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुळस येथे दोडामार्ग-विजघर राज्यमार्ग काहीसा खचत चालला होता. मात्र शनिवारी राज्यमार्गाला मधोमध चक्क एक भगदाड पडले आहे. शिवाय त्याठिकाणच्या रस्त्याची दोन्ही बाजूपट्टी ढासळत आहे. मधोमध मोठाले भगदाड पडले असून आजूबाजूचा रस्त्याचा भागही ढासळत चालला आहे. त्यामुळे तेथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही अपघात होऊ नये, यासाठी त्या भगदाडात झाडाची एक फांदी लावण्यात आली आहे. जेणेकरून वाहन चालकांना त्या भगदाडाचा अंदाज येईल. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हे भगदाड लवकर बुजवून खचत चाललेल्या रस्त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news