नितीन चंद्रकांत देसाई : कोकणच्या निसर्गात घडला कला दिग्दर्शक | पुढारी

नितीन चंद्रकांत देसाई : कोकणच्या निसर्गात घडला कला दिग्दर्शक

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. चित्रपट कलाक्षेत्रात भव्यता दिव्यता व ऐतिहासिक कलेच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात देशभरातून नावाजलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे जीवन संपवल्याचे वृत्त धक्कादायक आहे. ते कोकणातील दापोलीचे सुपुत्र. दिल्लीमध्ये स्वतंत्रता दिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे दर्शन मोठ्या दिमाखात जगासमोर मांडणारे म्हणून कायम त्यांचा अभिमान राहिला.

ठाण्यात ६ ऑगस्ट १९६५ ला जन्मलेल्या नितीन (Nitin Chandrakant Desai) यांचे बालपण मुंबईत आणि कोकणात गेले. दापोलीजवळ पाचवली गावातील निसर्ग त्यांच्यातील कलाकाराला घडवण्यास कारणीभूत ठरला. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जे.जे. व रहेजा या कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे कलादिग्दर्शनाचे धडे गिरवले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘तमस’, ‘चाणक्य’, ‘मृगनयनी’ यांसारख्या मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘परिंदा’, ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांसाठीही त्यांनी साहाय्य केले. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन करू लागले. या चित्रपटातील भव्य सेट्सनी सर्वांचे डोळे दिपवून टाकले आणि नितीन देसाई या नावाची जादू सगळीकडे पसरायला सुरुवात झाली. ‘खामोशी द म्युझिकल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंह’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जोधा अकबर’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘सलाम बॉम्बे’, ‘बुद्धा’, ‘जंगल बुक’, ‘कामसूत्र’, ‘सच अ लाँग जर्नी’, ‘होली सेफ’ या हॉलिवूड चित्रपटांसाठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. तब्बल चार चित्रपटांसाठी त्यांना कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटांखेरीज दूरदर्शन मालिकांसाठी, तसेच ‘गेम शोज’साठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘कौन बनेगा करोडपती’साठी देसाई यांनी उभारलेला सेट खूप गाजला. कलादिग्दर्शनामध्ये यश मिळाल्यानंतर देसाई यांनी चित्रपटांच्या आणि मालिकांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. ‘राजा शिवछत्रपती’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. त्यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटाचीही निर्मिती केली. ‘अजिंठा’ चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात उतरले.

तसेच त्यांनी ‘चंद्रकांत प्रॉडक्शन कंपनी लि.’ची स्थापना केली असून त्या अंतर्गत ‘माँ आशापुरा मतवाली’ या चित्रपटाची निर्मितीही केलेली आहे. कोणत्याही चित्रपटाचे कलादिग्दर्शन करताना त्यांनी अभ्यासपूर्ण रितीने ते केलेले दिसते. आलेल्या चित्रपटातील दृश्याचा विचार करतानाच त्यातील पात्रांचा, प्रसंगांचा-घटनांचा विचारही ते तारतम्याने करतात आणि मगच कलादिग्दर्शनाकडे वळतात. अभ्यासपूर्ण कलादिग्दर्शनामुळेच त्यांनी तयार केलेले सेट्स आखीव-रेखीव व प्रेक्षणीय होतात. त्यातली लय प्रेक्षकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शित केलेले चित्रपट पाहण्यासाठी, त्यातील भव्यता अनुभवण्यासाठी ते चित्रपट प्रेक्षक प्रेक्षागृहातच पाहतात, हाच त्यांच्या कामाचा यथोचित सन्मान आहे.

हेही वाचा : 

Back to top button