सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग, पुढारी वृत्तसेवा :  दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नदी, ओहोळ, नाल्यांना पूर आला. रस्त्यावरही पाणी साचले. तालुक्यातील लहान-मोठे काॅजवे पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. शिवाय तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग शनिवार पर्यंत होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रशासन सतर्क झाले व  ऑरेंज अलर्ट जारी केला. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस अवघ्या काही मिनिटांची विश्रांती घेत पुन्हा जोरदार कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहू लागले. झरेबांबर काजुळवाडी येथील कॉजवे, कुंब्रल येथील पुल पाण्याखाली गेले आहेत. शिवाय विजघर-दोडामार्ग राज्य मार्गावर घाटीवडे येथे पाणी आल्याने त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गटारे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे.

परिणामी रस्ते जलमय झाल्याने वाहतूक खोळंबली. पर्यायी मार्गाचा वापर करून चालकांना वाहने मार्गस्थ करावी लागली. तर काही ठिकाणी रस्त्यावरील पाणी कमी होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पाऊस काही अंशी कमी होऊन पुन्हा जोरात सरी कोसळत होत्या. जनजीवन विस्कळित झाले होते. सध्याच्या खरीप हंगामात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे.

मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी १०६.७० मीटर झाल्यास धरणाच्या दरवाजातून पुच्छ कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी तिलारी नदीला मिळते. सध्या धरणाची पाणीपातळी १०४ मी. च्या आसपास झाली आहे. त्यामुळे शनिवार पर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

तिलारी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, साटेली-भेडशी, आवाडे, कुडासे, मणेरी, वायंगणतड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याचा आला आहे. ग्रामस्थांनी नदीक्षेत्रात दिवसा अथवा रात्रीच्या वेळी ये-जा करू नये. नदीत उतरू नये. गुरे सोडू नयेत. महिलांनी कपडे धुण्यासाठी जाऊ नये. तसेच गावपातळीवरून गावात दवंडी पिटवून सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी नोटीस तिलारी पाटबंधारे विभागाने बजावली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button