

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वात मोठा कुशल कामगार पुरवठादार देशांपैकी एक बनण्याची क्षमता भारतात आहे. भविष्यात जागतिक स्तरावर मोबाईल वर्कफोर्स,अर्थात जगभर सेवा पुरवणारे मनुष्यबळ हे वास्तव बनणार आहे. जी-20 देशांनी, खऱ्या अर्थाने विकासाचे जागतिकीकरण आणि कौशल्याचे आदान-प्रदान करण्यामध्ये भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातील इंदुरमध्ये भरलेल्या जी-20 देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीतला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.
कौशल्य आणि पात्रतेच्या निकषावर, व्यवसायांना आंतरराष्ट्रीय संदर्भ देण्यामध्ये सदस्य देशांनी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधान म्हणाले की, यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समन्वय तसेच स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीच्या नवीन मॉडेलची आवश्यकता आहे. रोजगार पुरवठादार आणि कामगारांबद्दलची आकडेवारी, माहिती आणि डेटा सामायिक करण्याची गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. यामुळे जगभरातील देश उत्तम कौशल्य, कर्मचारी नियोजन आणि फायदेशीर रोजगारासाठी पुराव्यावर आधारित धोरणे तयार करण्यासाठी सक्षम होतील.
परिवर्तनात्मक बदल म्हणजे कामगारांच्या नवीन श्रेणींचे आणि व्यासपीठ अर्थव्यवस्थेचे नवे रूप असून, ते साथीच्या रोगाच्या काळात लवचिकतेचा आधारस्तंभ म्हणून उदयाला आले आहे. ते कामाची लवचिक व्यवस्था पुरवते आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांसाठी देखील पूरक आहे. महिलांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकारणाचे हे एक परिवर्तानात्मक साधन असून, यामध्ये विशेषत: तरुणांसाठी फायदेशीर रोजगार निर्मितीची अफाट क्षमता आहे. याची क्षमता ओळखून नव्या युगातील कामगारांसाठी नवीन धोरणे आणि उपाययोजना तयार करण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.
त्यांनी नियमित कामाच्या संधी निर्माण करण्यासाठी शाश्वत उपाय शोधण्याची आणि सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नवीन मॉडेल्स शोधण्याची सूचना केली.पंतप्रधानांनी भारताच्या ' ई श्रम पोर्टल' ची माहिती दिली, या पोर्टलवर जवळपास २८० दशलक्ष असंघटीत कामगारांनी आपली नोंदणी केली आहे, आणि त्यांच्या विशिष्ट गरजांवर उपाययोजना करण्यासाठी या माहितीचा वापर केला जात आहे. कामाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय बनले आहे म्हणून जगातील इतर देशांनी अशा प्रकारच्या उपायांचा अवलंब केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर आणि प्रक्रियेच्या माध्यमातून तंत्रकुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.कौशल्य मिळवणे, रिस्कीलिंग आणि कौशल्यवृद्धी हे भावी मनुष्यबळाचे मंत्र असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून भारतातील 12.5 दशलक्ष युवांना आतापर्यंत प्रशिक्षण मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आणि ड्रोन या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे असेही पंतप्रधानांनी नमूद केले.