आपत्कालीन मदत यंत्रणा सतर्क ठेवा; अजित पवार यांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश | पुढारी

आपत्कालीन मदत यंत्रणा सतर्क ठेवा; अजित पवार यांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन मदत यंत्रणा चोवीस तास सतर्क ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण होणारी पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामुळे करावे लागणारे नागरिकांचे स्थलांतर लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची कार्यवाही दिवसाच पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क करावे. आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button