

रत्नागिरी जिल्ह्यातील सुसेरी क्रमांक दोन या गावातील दोन दिवस बेपत्ता झालेल्या बाळकृष्ण करबटे यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मंगळवारी (दि. २६) खेड पोलिसांनी या प्रकरणी गावातीलच चार तरुणांना अटक केली आहे. दि. २४ रोजी रात्री करबटे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याच्या इराद्याने करबटे यांचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
खेड तालुक्यातील सुसेरी क्रमांक दोन येथे दिनांक २४ रोजी नातेवाईकांच्या कार्यासाठी मुंबई येथून आलेले बाळकृष्ण भागोजी करबटे (६५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरित्या बेपत्ता झाले होते. नातेवाईक व ग्रामस्थ यांनी त्यांचा शोध घेतला असता ते सापडून आले नव्हते. ग्रामस्थ करबटे यांचा शोध घेत असताना दि. २५ रोजी सकाळी गावानजीक वाहणाऱ्या नारिंगी नदीकिनारी स्मशानभूमीजवळ रक्ताचा सडा व मानवी हाताचे बोट आढळून आले होते.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. पोलिस निरीक्षक निशा जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे कर्मचारी अजय कडू, संकेत गुरव व साजिद नदाफ यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. बाळकृष्ण करबटे बेपत्ता प्रकरण व नदीकिनारी सापडलेले मानवी अवयव यांचा संबंध असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली. या घटनेशी गावातीलच संशयित आरोपी स्वयंम शशिकांत शिंदे (२१), अजय विजय शिंदे (२६), राजेश टाणकर (३६) व निलेश टाणकर (३४) सर्व राहणार सुसेरी क्रमांक दोन यांचा संबंध असल्याचे समजल्याने त्यांना दि. २५ रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
संशयित आरोपी अजय विजय शिंदे याने पोलिसांना नदीत लपवून ठेवलेल्या मृतदेहाचे ठिकाण दाखवले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा नदीपात्रातील मगरीच्या घबीतून मृतदेह बाहेर काढला. दिनांक २६ रोजी चारही संशयितांना भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.