वॉशिंग्टन : 'टेस्ला' चे सहसंस्थापक आणि अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. कंपनीचे सीईओ असलेल्या मस्क यांच्या नेटवर्थमध्ये 36.2 अब्ज डॉलर्सची वृद्धी झाली आहे. इलेक्ट्रिक कार बनवणार्या 'टेस्ला' कंपनीचा मार्केट कॅप 1 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे.
ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार सोमवारी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांची संपत्ती 288.6 अब्ज डॉलर्सची झाली. केवळ एकाच दिवसात त्यांनी 2.71 लाख कोटी रुपये कमावून एक नवा विश्वविक्रम घडवला.
हर्टज ग्लोबल होल्डिंग्ज कंपनीकडून एक लाख मोटारींची ऑर्डर मिळाल्यानंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली. शेअर्सच्या किमतीत 36.2 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. त्याचबरोबर टेस्लाची मार्केट कॅप 1 लाख कोटी डॉलर्स म्हणजेच एक ट्रिलियन डॉलर्सला पार करून गेली. टेस्लाच्या शेअरमधील ही मोठी उडी ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या इतिहासात नोंदवलेला सर्वात मोठा फायदा ठरला आहे. हर्टजने एक लाख टेस्ला कार खरेदी करण्याची ऑर्डर दिल्यानंतर हे सर्व घडले.
याशिवाय मॉर्गन स्टॅनलेने टेस्लाच्या शेअर्सची किंमत वाढवून 1200 डॉलर्स केली आहे. शेअर्समधील तेजीमुळे टेस्लाचे मार्केट कॅप 1 लाख कोटी डॉलर्सच्या पार गेले. अर्थात हे जगातील सर्वात मोठी कंपनी 'अॅपल'पेक्षा कमीच आहे. अॅपलचे मार्केट कॅप 2.5 लाख कोटी डॉलर्स आहे.