

घाटकोपर; पुढारी वार्ताहर : पती-पत्नी, मुलगी आणि जावई अशा चार जणांनी कारमधून 2000 किलोमीटरचे अंतर कापून थेट काश्मीर मधून मुंबईत आणलेला 14 कोटी 40 लाख रुपयांचा उच्च प्रतीचा चरस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दहिसर परिसरातून जप्त केला. या प्रकरणी बंडू दगडू उदानशिवे(52), त्याची पत्नी क्लेरा बंडू उदानशिवे (52), मुलगी सिंथिया बंडू उदानशिवे(23) आणि जावई जाफर जहांगीर शेख (24) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
काही टोळ्या रेल्वे, खासगी बस व अन्य खासगी वाहनांतून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, नेपाळ येथून मोठ्या प्रमाणात चरस मुंबईत आणून अमली पदार्थ पुरवठादारांना देतात. श्रीनगर येथून कोट्यवधी रुपयांचा चरसचा साठा मुंबईत आला असून त्याची देवाणघेवाण दहिसर परिसरात होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती.
महिलांचा समावेश असलेली एक टोळी काश्मीरमधून चरस आणून चंदेरी सँट्रो कारमधून मुंबई शहरात विक्री करत असल्याचे गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांना समजले. त्यावरून गुन्हे शाखेच्या युनिट 7 चे पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम यांनी युनिट सहा आणि सात यांचे पथक तयार केले. या पथकाने सोमवारी (दि. 25) दहिसर पोलीस चौकीजवळ सापळा लावला. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या चंदेरी सँट्रो कारमध्ये चारही आरोपी होते. पोलिसांनी या कारची तपासणी केली.
पोलिसांनी या कारमधून 14 कोटी 40 लाख रुपयांचा तब्बल 24 किलो उच्च प्रतीचा चरस जप्त केला. त्याचप्रमाणे 4 लाख रुपयांची सँट्रो कार, 45 हजार 100 रुपयांची रोकड आणि काही मोबाईल असा 14 कोटी 44 लाख 68 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात जप्त घेतला. या प्रकरणी गुन्हे शाखेने दहिसर पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यातखाली गुन्हा दाखल करून बंडू उदानशिवे, क्लेरा उदानशिवे, सिंथिया उदानशिवे आणि जाफर शेख यांना अटक केली. स्थानिक न्यायालयाने या चौघांनाही 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या टोळीचा म्हारक्या असलेल्या बंडू उदानशिवे याने श्रीनगर येथून चरसचा साठा मुंबई शहरात विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो कुटुबीयांना सोबत घेऊन अमली पदार्थांची डिलीव्हरी करीत होता. या टोळीने कारच्या दरवाजाचे पॅनल, डिकीचे पॅनल आणि अन्य पोकळ्यांमध्ये शिताफीने चरसची पाकिटे भरून ठेवून वर कव्हर बसवले होते. पोलीस या चौघांची कसून चौकशी करत आहेत. ही टोळी ड्रग्ज तस्करीत कधीपासून सक्रिय आहे, आतापर्यंत कोणाला अमली पदार्थ पुरवले आहेत, याचा पोलीस तपास करीत आहेत.