सिंधुदुर्ग: साळशीची मुले अद्यापही शाळेबाहेरच; दुसऱ्या दिवशीही आंदोलनाला तोडगा नाही | पुढारी

सिंधुदुर्ग: साळशीची मुले अद्यापही शाळेबाहेरच; दुसऱ्या दिवशीही आंदोलनाला तोडगा नाही

शिरगाव; पुढारी वृत्‍तसेवा :  देवगड तालुक्यातील केंद्र शाळा साळशी येथे सेमी इंग्लिशसाठी बीएससी, बीएड कायमस्वरुपी शिक्षकाची मागणी ग्रामस्थांनी २०१६ पासून केली होती. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने १५ जून सकाळी १० वाजल्यापासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या उपोषणाला गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच शिष्ट मंडळाला देवगड पंचायत समितीमध्ये चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र ग्रामस्थांना योग्य निर्णय जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आज दुसऱ्या दिवशीही हे शाळा बंद आंदोलन आणि बेमुदत उपोषण ग्रामस्‍थांनी चालूच ठेवले.

देवगड तालुक्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा साळशी नं. १ या प्रशालेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, सेमी इंग्लिश विषय सुरू आहे. त्यामुळे या शाळेत बीएससी, बीएड प्राप्त शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी २०१६ पासून होती. याबाबत दोन महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाकडे मागणी ग्रामपंचायत साळशी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केली होती. त्याची पूर्तता न झाल्याने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १५ जून रोजी सकाळी १० वाजता केंद्र शाळा साळशी नं १ येथे ग्रामस्थ, पालक विद्यार्थ्यांसह आंदोलन आणि उपोषण सुरू केले.

मात्र, संबंधित शैक्षणिक विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सदरचे आंदोलन व उपोषण दुसऱ्यादिवशी पण चालूच ठेवण्यात आले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. सिंधुदुर्ग यांच्याकडून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती सुरू होणार असल्याने जि. प. प्राथमिक शाळा साळशी नं १ या प्रशालेला प्राधान्याने बीएससी, बीएड शिक्षकाची व्यवस्था करण्यात येईल असे लेखी त्यांच्या प्रतिनिधी मार्फत कळविण्यात आले होते. मात्र उपोषणकर्त्यांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.

या उपोषणाच्या पहिल्या दिवशी शिक्षण विस्तार अधिकारी लवू दहिफळे, केंद्रप्रमुख सौ. वर्षा लाड यांनी भेट दिली. आज दुसऱ्या दिवशी माजी सभापती रवींद्र जोगल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी देखील भेट दिली. उपोषणाला सरपंच सौ. वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, माजी सरपंच वैभव साळसकर, अनिल पोकळे, किशोर साळसकर, विक्रांत नाईक, संतोष साळसकर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मिराशी, विशाखा साळसकर, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पोलीस नाईक महेंद्र महाडिक, कृष्णा जोईल, पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button