शासन आपल्या दारी मग कशाला हवी रत्नागिरी वारी? | पुढारी

शासन आपल्या दारी मग कशाला हवी रत्नागिरी वारी?

रत्नागिरी, दीपक कुवळेकर शासनाने मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी ही योजना राबवली खरी मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. या योजनेत शासन आपल्या दारी असले तरी सर्वसामान्य जनतेला अगदी मंडणगड पासून राजापूर पर्यंत नागरिकांना रत्नागिरीत बोलवल जात आहे. यावर कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जात आहे. शासन आपल्या दारी मग कशाला हवी रत्नागिरी वारी? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शासन आपल्या दारी योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना तातडीने फायदा मिळावा हा हेतू शिंदे-फडणवीस सरकारने ठेवला असताना, मोठा गाजावाजा करीत कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ‘शासन आपल्या दारी मग तासभराच्या कार्यक्रमासाठी कशाला हवी रत्नागिरीची वारी’ असा सवाल करीत लोकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आता ग्रामीण भागात होऊ लागली आहे.

‘शासकीय काम म्हणजे चार महिने थांब’ ही म्हण सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित आहे. शासकीय योजनांचा लाभ अनेकदा वेळेवर मिळत नाही, त्यासाठी कार्यालयाच्या चकरा चपला झिजेपर्यंत माराव्या लागतात असे ठाम मत सर्वसामान्यांचे बनले आहे. परंतु सर्वसामान्यांमधून मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’ ही नवी योजना जाहीर केली. यामुळे लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागू नयेत असा त्यामध्ये हेतू आहे. शासनाच्या 75हून अधिक योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना यातून मिळणार आहे. अगदी दाखल्यांपासून कृषी, आरोग्य, कामगार कल्याणपर्यंतची कामे यातून होणार आहेत. बचत गटांना बळ मिळणार आहे.

योजना चांगली असली तरी गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात शासन आपल्या दारी योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आधीच रत्नागिरीत तपमान 38 ते 39 पर्यंत पोहचले असून नागरिक उन्हाच्या काहिळीने हैराण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात श्रीसदस्यांना झालेला त्रास पाहिल्यानंतर रत्नागिरीत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. यासाठी कोट्यवधी रुपये जिल्हा प्रशासनाने खर्च केले आहेत. कार्यक्रमाला येणार्‍यांना फॅन, कुलरसह खाण्यापिण्याची सुविधा करण्यात आली आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेणार्‍या बचत गटांच्या महिला व अन्य लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी येण्यास ‘अनिवार्य’ करण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या नावांची यादी तयार करुन प्रशासनाला पोहचवण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी आलेच पाहिजेत यासाठी तलाठी, ग्रामसेवकांनाही ‘कामा’ला लावण्यात आले आहे. एका दाखल्यासाठी संपूर्ण दिवस कशाला फुकट घालवायचा असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये दाखल्यांचे वाटप झाले असते तर ही योजना खरोखर ‘दारा’पर्यंत पोहचल्याचे समाधान वाटले असते अशा प्रतिक्रियाही आता उमटत आहेत. या योजनेचा गाजावाजा करण्यासाठी त्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत ‘शासन आपल्या दारी मग तासभराच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची कशाला हवी रत्नागिरीची वारी’ अशा चर्चा आता गावकीच्या चावड्यांवर रंगू लागल्या आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button