रत्नागिरी : कुंभार्ली घाटात साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्षांच्या गाडीचा अपघात | पुढारी

रत्नागिरी : कुंभार्ली घाटात साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्षांच्या गाडीचा अपघात

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष आपल्या पत्नी व मुलासह सातारराहून गावी वेहेळे (ता. चिपळूण) जात असताना कुंभार्ली घाटात गाडीचे चाक फुटून गाडी उलटली. यावेळी काही ग्रामस्थांनी व प्रवाशांनी गाडीमधील तीघांना सुखरुप बाहेर काढले. यावेळी साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व त्यांचे कुटुंबीय बचावले.

या अपघातात गाडीचे साडेतीन ते चार लाख रुपये नुकसान झाले आहे. हा अपघात सोमवारी (दि.२२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला. चिपळूणचे शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख विनोद झगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा हात दिला. तर आ. शेखर निकम, राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम व सतिश राजेशिर्के(वेहेळे) यांनी विचारपूस केली.

सोमवारी सकाळी ९ वाजता साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, त्यांची पत्नी व सातारा मनपाच्या माजी सभापती स्नेहल राजेशिर्के व त्याचे सुपूत्र आपल्या मूळ गावी वेहेळ येथे जाण्यासाठी प्रवासी वाहन (एमएच ११ सीसी ७११) या वाहनाने प्रवास करत होते. सोनपात्रा मंदिराजवळ आल्यावर रस्त्यावरील दगडावर गाडी वेगात आदळली.

यामध्ये वाहनाचे चाक फुटले यामुळे गाडी रस्त्यावर उलटली होऊन कोलांट्या घेऊन मध्येच अडकली. यामुळे वाहतूक ठप्प झाली. इतर प्रवाशांनी गाडीमधील तिघांनाही सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने त्यांना फारसे लागले नव्हते. यानंतर गाडी बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघातात कारचे साडे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे. अपघाताची बातमी समजताच राजेशिर्के यांच्या अनेक मित्रमंडळी व नातेवाईकांनी त्यांची चौकशी केली.

हेही वाचा;

Back to top button