जगबुडी नदीत होणार बोटिंगसह क्रोकोडाईल पार्क!

जगबुडी नदीत होणार बोटिंगसह क्रोकोडाईल पार्क!

खेड ; पुढारी वृत्तसेवा : जगबुडी नदी मध्ये आता बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्क होणार असून, त्यासाठी राज्य शासनाने 9 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासन निर्णय 5 जुलैला प्रसिद्ध झाला असल्याची माहिती दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी खेडमध्ये पत्रकार परिषदे मध्ये दिली.

खेड तालुक्यासाठी जगबुडी नदी किनारी विकास होणे गरजेचे आहे. त्याचाच भाग म्हणून शहरांमध्ये होणार बोटिंग क्लब व मगर पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पा मुळे खेडच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. याबद्दल नुकतीच आ. योगेश कदम यांनी खेड सभापती निवास येथे पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. ते म्हणाले की, खेडची जिल्ह्यात वेगळी ओळख या प्रकल्पामुळे निर्माण होईल.

हा परिसर विकसित होऊन पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. या बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्क मुळे स्थानिकांना रोजगारही मिळणार असून खेडचे अर्थकारण बदलण्यास मोठा हातभार लागणार आहे. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे या बोट क्लबसाठी आग्रही होते. त्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव खेड न.प.ने नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. तो मंजूर व्हावा, यासाठी आपण आमदार म्हणून तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनीही पाठपुरावा केला होता.

शासनाने येत्या 31 मार्च 2022पर्यंत हा निधी खर्च करावे लागणार आहेत. नगर परिषदेच्या अखत्यारित हा बोट क्लब होणार असून, शासनाकडून 100 टक्के निधी देण्यात आला आहे. लवकरच या कामास प्रारंभ होणार असून निवदा प्रक्रिया आदी बाबी वेगाने होणार आहेत.

या बाबत आ. योगेश कदम म्हणाले की, या प्रकल्पासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करू नये. खेड शहर मुंबई -गोवा महामार्गावर असल्याने बाहेरीलही पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतील आणि त्याचा उपयोग येथील स्थानिक बोरोजगाराना होणार आहे. कोकणात अशा प्रकारचा बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्क प्रथमच साकारत असल्याने खेडचे नाव कोकणातील पर्यटन क्षेत्र म्हणून घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बोटींग क्लब खास वैशिष्ट्ये

बोट क्लबसाठी अद्ययावत जेटी उभाणार
पर्यटकांना रेस्ट हाऊस
पर्यटकांना फेरफटका मारण्यासाठी नदीच्या बाजूला पादचारी मार्ग
उत्तम बगिचाची निर्मिती
स्नागगृह, स्वच्छतागृह, मगरी पाहण्यासाठी 'व्ह्यू पॅाईंट'.
क्लब हाऊस, रेस्ट हाऊस
पर्यटकांना बसण्यासाठी एफआरपी बोट.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news