रत्‍नागिरी : लोटे व बोरज सरपंचांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल | पुढारी

रत्‍नागिरी : लोटे व बोरज सरपंचांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या लोटे व बोरज या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचां विरोधात संगनमताने जमीन हडप केल्या व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी खेड येथील पोलीस ठाण्यात (दि.१६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैभव विलास आंब्रे यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार वैभव आंब्रे यांनी या प्रकरणी (दि.१६) दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २० मे २०२० रोजी खेड तहसीलदारांकडे लोटे येथील सुमारे ५ एकर जमीन मिलकतीसाठी कुळ म्हणून नाव दाखल व्हावे यासाठी बोरज ग्रामपंचायतीचे सरपंच घोसाळकर यांनी अर्ज केला होता. त्यानुसार दि. २८ जुलै २०२० रोजी तहसीलदारांनी घोसाळकर यांना कुळ म्हणून घोषीत केले. त्यानंतर दिनांक २१ जानेवारी २१ रोजी मुळ मालकाचे नाव कमी करून घोसाळकर यांचे कुळ म्हणून नाव दफ्तरी दाखल केले.

परंतु, जी मिळकत लोटे ग्रामपंचायतीच्या आहे व अर्ज करणारे विशाल घोसाळकर हे बोराज गावातील रहिवासी असताना त्यांचा या मिळकती सोबत काहीही संबंध नसताना तत्कालीन लोटे ग्रामपंचायत उपसरपंच व विद्यमान सरपंच चंद्रकांत रघुनाथ चाळके यांनी या दाव्यामध्ये ८ मे २०२० रोजी ओळख म्हणून प्रतिज्ञापत्र दिले होते. त्या प्रतिज्ञापत्रात घोसाळकर सदर मिळकतीत भातपीक व कवळ तोडतात असा खोटा उल्लेख चाळके यांनी केला होता. वास्तविक सदर जागेत मालक किरण मेहता व इतर यांच्या इमारत बांधकामाच्या नोंदी लोटे ग्रामपंचायतीच्या दफ्तरी दाखल आहेत, हे माहीत असूनही विद्यमान सरपंच चाळके यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन व दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी खोटा जबाब देऊन बोरज सरपंच घोसाळकर यांची मदत केली आहे, असे आंब्रे म्हणाले.

या मिळकतीत असेलल्या इमारतीचे कर थकीत असल्याची कल्पना सरपंच चाळके याना असूनही त्यांनी ही बाब शासनाच्या निदर्शास आणून न देता खेड तहसीलदार व शासनाची फसवणूक केली आहे. जमीन मालक किरण मेहता गेले अनेक वर्षे बेपत्ता असल्याची गैरफायदा घेत औद्योगिक वसाहतीतील मोक्याची ठिकाणी असलेली बहुमूल्य जमीन हडप केली म्हणून मी बोरज सरपंच विशाल विवेक घोसाळकर (रा. बोरज, ता. खेड) व लोटे सरपंच चंद्रकांत रघुनाथ चाळके (रा. लोटे, ता. खेड) यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.१६ मे २०२३ रोजी खेड पोलीस स्थानकात भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले विशाल घोसाळकर हे बोरज् ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच म्हणून गेली सुमारे तीन वर्षे कार्यरत आहेत. तर चंद्रकांत चाळके हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख व लोटे गावचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा;

Back to top button