

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : बारसू सड्यावर आंदोलकान्ना भेटण्यासाठी चाललेले खासदार विनायक राऊत व सेनेचे अन्य पदाधिकारी यान्ना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सायंकाळी त्या सर्वांची मुक्तता करण्यात आली. सकाळी बारसू येथील सड्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना भेटण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे पदाधिकाऱ्यांसह चालले असता पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
सायंकाळी साडेचारच्या दरम्यान त्यांची मुक्तता करण्यात आली. खासदार राऊत यांच्या समर्थनार्थ राजापूर पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाचे पदाधिकारी जमा झाले होते. खासदार राऊत यांच्या मुक्ततेनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टिका केली. पोलीस बळाचा सुरु असलेला वापर याबाबत संताप व्यक्त केला. लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नंतर खासदार राऊत व त्यांचे सहकारी यानी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांची त्यान्नी भेट घेतली. दरम्यान गुरुवारी रात्री नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनाचे नेते अशोक वालम व त्यांचे सुपुत्र विनेश वालम यान्ना पोलीसान्नी अटक करण्यात आली होती.