लांजा: पुढारी वृत्तसेवा: गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो पकडून तब्बल २४ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक विशाल रघुनाथ तुपे (रा.खेराडे तुपेवाडी, ता. कडेगाव, जि.सांगली) याला अटक केली. ही कारवाई आज (दि. २६) सकाळी लांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोर्ले (ता. लांजा) येथे केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारुची गोवाहून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कोर्ले येथे आज सकाळी ९.४५ वाजण्याचा सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा टेम्पो (एमएच.०२.एफ जी.५४८६) थांबविला. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोच्या हौद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आढळून आला.
यावेळी गोवा बनावटीची १५ लाख ३६ हजार रुपयांच्या दारूचे २०० खोके, ९ लाख रूपयांचा टेम्पो व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण २४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशाल तुपे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व्ही. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुधीर भागवत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, वाहन चालक संदीप विटेकर यांनी केली. पुढील तपास निरीक्षक व्ही.एस.मोरे करीत आहेत.
हेही वाचा