रत्नागिरी : परशुराम घाटातील एक लेन पावसाळ्यापूर्वी सुरू होणार | पुढारी

रत्नागिरी : परशुराम घाटातील एक लेन पावसाळ्यापूर्वी सुरू होणार

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दि. 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत दररोज पाच तास वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या दरम्यान घाटातील अवघड भागातील चौपदरीकरण व भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. कल्याण टोल कंपनीमार्फत हे काम सुरू असून, अवजड वाहने महामार्गाच्या दुतर्फा पाच तास खोळंबून राहात आहेत. या शिवाय या कालावधीत जिल्ह्यातील शेकडो एस.टी. फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून, पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी सुरू होईल, असा विश्वास कंपनीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील चौपदरीकरण पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनासह संबंधित ठेकेदार कंपनीने कंबर कसली आहे. मंगळवार दि.25 पासून दुपारी 12 वाजल्यापासून या कामाला प्रारंभ झाला असून, संरक्षक भिंतीच्या लगत असणार्‍या रस्त्यावर भराव केला जात आहे तर सायंकाळी 5 वाजल्यानंतर वरच्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. दिवसा पाच तास युद्धपातळीवर काम केले जाणार आहे. सायंकाळी 5 ते दुपारी 12 पर्यंत परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला असून, या दरम्यान खोळंबलेली अवजड वाहतूक सोडण्यात येणार आहे. तर छोट्या वाहनांना आंबडस-चिरणी मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध असून, या मार्गावरून चोवीस तास वाहतूक सुरू राहणार आहे.

पुढील पंधरा दिवस लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मात्र परशुराम घाटबंदीचा फटका बसणार असून, त्यांना आंबडस-चिरणी मार्गे वळसा पडणार आहे. दुपार सत्रातील वाहनांना आंबडस-चिरणी मार्गे जावे लागणार आहे. शिवाय परशुराम ग्रामस्थांना देखील यामुळे वळसा पडणार आहे. मात्र, पंधरा दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा संकल्प संबंधित कंपनीने केला असून, पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंतीलगतची एक लेन वाहतुकीस खुली होईल. पावसाळ्यात हीच लेन वाहतुकीसाठी सुरू राहील, असा विश्वास कंपनीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button