सलोखा योजनेअंतर्गत कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हयात पहिले प्रकरण निर्णीत | पुढारी

सलोखा योजनेअंतर्गत कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हयात पहिले प्रकरण निर्णीत

खेड शहर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून सलोखा योजनेबाबत महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाकडील तरतूदीनुसार एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्यांकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा नांवावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र १००० रूपये नोंदणी फी आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे.

दिनांक २२ व २३ फेब्रवारी २०२३ रोजी लोणी (जि. अहमदनगर) येथे झालेल्या महसूल परिषदेनंतर उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हयाची आढावा बैठक घेतली होती. रत्नागिरी जिल्हयामध्ये सलोखा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना त्यांनी संबोधित केले.

या योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील मौजे राजवेल येथील गट नंबर ३६, क्षेत्र ०-१२-० हे. आर, आकार ०-०६ ही शेतजमीन अब्बास अ. रहिमान हमदुले, महमद हनिफ अ. रहिमान हमदुले व  मुश्ताक अ. रहिमान हमदुले यांचे सामाईक नावे दाखल असून, सदरची शेतजमीन महामुद म. हुसेन हमदुले हे गेली १७ वर्षे वहिवाट करुन  कसत आहेत. तर या गांवामधील गट नंबर ७९, क्षेत्र ०-२४-० हे. आर, आकार ०-१३ ही शेतजमीन महामुद म. हुसेन हमदुले यांचे नावे दाखल असून, सदरची शेतजमीन अब्बास अ. रहिमान हमदुले, महमद हनिफ रहिमान हमदुले व  मुश्ताक रहिमान हमदुले हे गेली १७ वर्षे वहिवाट करून कसत आहेत.

कोकण विभागाचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी  एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात एक शिबीर घेण्याची सूचना दिली होती. या संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच २१ प्रस्ताव सादर केले असून काल खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी खेड तालुक्यात सलोखा योजनेअंतर्गत जिल्हयातील पहिले प्रकरण निर्णीत करुन शेतकऱ्याला जमिनीचा हक्क मिळवून दिलेला आहे.

आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या कामासाठी कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button