रत्नागिरी : खेडमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार | पुढारी

रत्नागिरी : खेडमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

खेड; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती तर्फे आजपासून (दि.१४) राज्यव्यापी बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. या संपात खेडमधील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. शहरातील पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आंदोलकांकडून निदर्शने व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली एनपीएस पद्धतीने सेवा निवृत्ती रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जवळपास सर्वच सरकारी व निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. खेड पंचायत समिती कार्यालयासमोर आज हजारो कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शिक्षकांचा सक्रिय सहभाग होता. आरोग्य, पंचायत समिती, महसूल कर्मचारी यांनी देखील आंदोलनाला हजेरी लावली. सर्वच सरकारी व निमसरकारी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने तालुक्यातील सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय व सर्व शासकीय कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. आंदोलकांनी एकजूट दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Back to top button