Dapoli resort case | दापोली रिसॉर्ट प्रकरणी माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना अटक | पुढारी

Dapoli resort case | दापोली रिसॉर्ट प्रकरणी माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : दापोली रिसॉर्ट प्रकरणात माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिली आहे. (Dapoli resort case) याआधी या प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. त्यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट बेकायदा बांधकाम प्रकरणी ‘ईडी’ पथकाने गेल्या शुक्रवारी १० मार्च रोजी पहाटे त्यांना ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे भाऊ आहेत. नुकत्याच खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग होता.

सदानंद कदम यांची ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरू केली होती. दापोलीतील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टसोबत सदानंद कदम व ठाकरे गटातील माजी मंत्री अनिल परब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने केल्याल्या या कारवाईमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.जयराम देशपांडे हे दापोलीचे प्रांत अधिकारी होते. त्यांच्या कार्यकाळात साई रिसॉर्टच्या बांधकामाला परवानगी मिळाली होती. आता साई रिसॉर्टच्या प्रकरणात ईडीने कारवाई तीव्र करण्यास सुरवात केली असल्याचे दिसते. यापूर्वी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचे सरकारने निलंबन केले होते. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती. या पदावर असताना अनियमितता या आरोपाखाली त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनीसुद्धा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देताना दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दखल घेत मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

विरोधकांना टार्गेट करीत ईडीने पुन्हा कारवाईचा धडाका लावला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचे उघडकीस आले आहे. याच अनुषंगाने अनिल परब यांनी ईडीच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. ज्येष्ठ वकील अॅड. अमित देसाई यांनी ही कारवाई खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. ईडीकडून निष्कारण, राजकीय हेतूने प्रेरित कारवाई केली जात आहे. या केंद्रीय तपास यंत्रणेला कुठलीही कठोर कारवाई करण्यापासून रोखा, तसेच ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती केली.

हे ही वाचा :

Back to top button