ईडीविरोधात अनिल परब यांचीही हायकोर्टात धाव | पुढारी

ईडीविरोधात अनिल परब यांचीही हायकोर्टात धाव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनीसुद्धा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देताना दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दखल घेत मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

विरोधकांना टार्गेट करीत ईडीने पुन्हा कारवाईचा धडाका लावला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचे उघडकीस आले आहे. याच अनुषंगाने अनिल परब यांनी ईडीच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. ज्येष्ठ वकील अॅड. अमित देसाई यांनी ही कारवाई खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. ईडीकडून निष्कारण, राजकीय हेतूने प्रेरित कारवाई केली जात आहे. या केंद्रीय तपास यंत्रणेला कुठलीही कठोर कारवाई करण्यापासून रोखा, तसेच ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती केली.

Back to top button