रत्नागिरी : जि.प. कॅन्टीनला ठाकरे-शिंदे वादाची ‘झळ’; कॅन्टीन खाली करण्याचे आदेश | पुढारी

रत्नागिरी : जि.प. कॅन्टीनला ठाकरे-शिंदे वादाची ‘झळ’; कॅन्टीन खाली करण्याचे आदेश

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा वाद जोरात सुरू आहे. या वादाची झळ जिल्हा परिषदच्या कॅन्टीनला बसली आहे. या राजकारणात कॅन्टीन बंद करण्याचे आदेश प्रशासनाने काढल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सारंकाही आलबेल नाही अशीच परिस्थिती आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आल्याने ठाकरे गटात चिंता वाढली आहे.

मात्र, दुसर्‍या बाजूला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे. शिंदे-ठाकरे गटाचा वाद हा गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे. ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावा असे वेळोवेळी त्यांचे ज्येष्ठ नेते आवाहन करत आहेत. मात्र कार्यकर्त्यांचा संयम सुटताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दापोली व खेडमध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसत होते.

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्रा.प.निवडणूकीतसुद्धा याचे पडसाद उमटले होते. या निवडणूकीत बड्यज्ञा नेत्यांनी सहभाग घेतल्याने रत्नागिरी तालुक्यातील निवडणूकीत स्थानिक राजकारण ढवळून निघाले होते. या ठाकरे – शिंदे गटाचा वादाचा फटका जिल्हा परिषदेला बसल्याचे चित्र दिसत आहे. या वादात जि.प.चे कॅन्टीनच बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

कॅन्टीनचा ठेकेदार हा शहरानजीकच्या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत त्याने शिंदे गटाच्या उमेदवाराचा त्याने पराभव केला होता. हा वाद गेले काही महिने सुरू आहे. अशातच या ठेकेदाराला जि.प. प्रशासनाकडून आठ दिवसांपूर्वी कॅन्टीन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तीन महिन्याचे भाडे थकले म्हणून त्याच्यावर ही कारवाई केली असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मूळात या ठेकेदाराचे जि.प.च्या विविध विभागात लाखो रुपयांची बिले येणे बाकी आहेत. त्याचबरोबर या ठेकेदाराची अनामत रक्कमही जि.प.कडे जमा आहे. असे असतानासुद्धा कॅन्टीन बंद करण्याची नोटीस संबंधीत ठेकेदाराला दिल्याने सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दोन आमदारांमध्ये शीतयुद्ध…

जि.प. कॅन्टीन बंदच्या आदेशाला राजकारणाची झळ असल्याने सहाजिकच दोन आमदारांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यातील शिंदे गटाच्या मोठ्या आमदाराने हे कॅन्टीन या ठेकेदाराकडून काढून घ्या, असे तोंडी फर्मान काढल्याने प्रशासनाने ही कारवाई केली, अशी चर्चा सुरू आहे. तर दुसर्‍या बाजूला ठाकरे गटाच्या आमदाराने गेल्या आठवड्यात जि.प. भवनामध्ये येवून प्रशासनाला चांगलेच झापले होते. जवळपास दोन तास हा आमदार ठाण मांडून बसल्याची चर्चा असून कॅन्टीन बंद केलंत तर याद राखा, अशी धमकीही दिल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा;

Back to top button