आरवली; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथे एक अज्ञात तरुणाने एका अल्पवयीन मुलीला मान धरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने त्याचा प्रयत्न असफल झाला. या घटनेने माखजन परिसर हादरून गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार सकाळी ग्रामपंचायत परिसरातील एक अल्पवयीन मुलगी दुकानावर जात असताना एक तरुण मोटारसायकलवरून आला.
मुलीच्या सोबत कोणी नाही याची संधी साधून या तरुणाने त्या मुलीला पकडले व माझ्यासोबत चल अशी फूस लावळण्यास सुरुवात केली. मुलीने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिला.
यामुळे या तरुणाने तिची मान धरून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या अल्पवयीन मुलीने प्रतिकार केला व आरडाओरडा केल्याने तो तरुण आपली मोटारसायकल तेथेच सोडून पळ काढला.
याबाबत संगमेश्वर पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक उदय झावरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले व तपास सूरु केला.
या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्या तरुणाचा कसून शोध घेण्यात येत आहे. आज दिवसभर बुरंबाड, माखजन परिसर पोलिसांनी पिंजून काढला. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.