रत्नागिरीत ठाकरे गटाचे वर्चस्व तर बाळासाहेबांच्या शिवसेनेची मुसंडी; भाजपाची ताकद वाढली | पुढारी

रत्नागिरीत ठाकरे गटाचे वर्चस्व तर बाळासाहेबांच्या शिवसेनेची मुसंडी; भाजपाची ताकद वाढली

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी तालुक्यात झालेल्या २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये कॉटे की टक्कर दिसून आली. यात ठाकरे गटाने वर्चस्व राखण्यात यश आले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोरदार लढत दिली. ठाकरे गटाचे १४ सरपंच निवडून आणत बाजी मारली आहे. शिंदे गटाचे १० आणि भाजपने इतर पाच ठिकाणी विजय मिळवला आहे. काही ठिकाणी सत्तांत्तर झाले आहेत.

रत्नागिरी तालुक्यात २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगल्या आहेत. त्यातील सहा सरपंच बिनविरोध झाल्याने सदस्यपदांसाठी २५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रंगली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता सामाजिक न्याय भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला केळ्ये ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने सरपंचांसह बहुमत मिळवत जोरदार वाटचालीला सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या गणेशगुळेमध्येही सत्तापरिवर्तन करीत शिंदे गटाने भाजपला मात दिली. या ठिकाणी शिंदे गटाच्या सरपंच व सदस्यांनी बाजी मारत वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली.

पहिल्या टप्प्यात कासारवेलीमध्ये भाजपची सत्ता उलथवून लावत ठाकरे गट महाविकास आघाडीने सत्ता परिवर्तन करीत विजय मिळवला. जांभारीमध्ये अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने वर्चस्व प्राप्त केले. हरचिरी जिल्हा परिषद गटातील टेंभ्ये, तोणदे व टिके या ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने यश मिळवले आहे. याठिकाणी माजी जि. प. सदस्य महेंद्र झापडेकर यांनी ठाकरे गटाचे वर्चस्व सिध्द केले.

भाजपच्या एकगठ्ठा मते असलेल्या काही मोजक्या ग्रामपंचायती असून त्यात धामणसे गावाचा समावेश आहे. याठिकाणी भाजपने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. सडे पिरंदवणे येथेही भाजपने ठाकरे गट, शिंदे गट व महाविकास आघाडीविरोधात यश मिळवले. चाफेरी येथे भाजपाने बाजी मारली असून, माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. निवळी येथे भाजपाने आपले वर्चस्व राखले आहे. या ठिकाणी एका सदस्यपदासाठी निवडणूक झाली. त्या जागेवरही भाजपाचे प्रमोद निवळकर विजयी झाले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेने केळ्ये, साठरेबांबर, वळके, वेतोशी, गणेशगुळे, सत्कोंडी, जांभारी, विल्ये व निवेंडी ग्रामपंचायती आपल्याकडे आल्याचा दावा केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी चांदोर, टिके, तोणदे, टेंब्ये, तरवळ, पूर्णगड, मालगुंड, भगवतीनगर, कासारवेली, मावळंगे, फणसवळे याठिकाणी विजय मिळवल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे करबुडे, निरुळ, बोंड्ये या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती ठाकरे गटाचे सरपंच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशगुळे येथे गतवेळी भाजपाची सत्ता होती. ती शिंदे गटाने खेचून घेतली आहे. तर मावळंगे येथे असणारी भाजपाची सत्ता ठाकरे गटाने उलथवून टाकली आहे. रत्नागिरी तालुक्यात ठाकरे गटाने वर्चस्व कायम राखले असून, बुधवारी विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या सरपंच व सदस्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश म्हाप म्हणाले की, पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. भविष्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत भाजपाला पाच ग्रामपंचायती मिळाल्या असल्या तरी अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्यही विजयी झाल्याने तालुक्यात भाजपाची ताकद वाढू लागली आहे.

हेही वाचा :

Back to top button