Gold Reserves In Sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याचा साठा सापडला | पुढारी

Gold Reserves In Sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याचा साठा सापडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागवाडी आणि घनपेवाडी भागात सोन्याचा साठा (Gold Reserves In Sindhudurg)  सापडला आहे. या साठ्यांचे खासगी क्षेत्राकडून खाणकाम करून घेण्यास राज्य सरकारने तयारी केली आहे. सोन्याच्या खाणकामातून राज्य सरकारला मोठा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

व्यापारी कोळसा खाणींच्या लिलावासाठी आयोजित गुंतवणूकदारांच्या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची पुष्टी केली आहे. महाराष्ट्रातील 11 कोळसा क्षेत्र लिलावासाठी उपलब्ध आहेत, त्यापैकी दोन गोल्ड प्लॅटिनम ग्रुप एलिमेंट्स (PGE) निकेल-क्रोमियम आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि एमईसीएल (पूर्वी मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड) यांनी जवळपास 36 ब्लॉक्सचा शोध घेतला आहे. हे ब्लॉक्स योग्य प्रक्रियेनंतर लिलावासाठी टाकले जातील. योग्य धोरणात्मक उपायांसह, आम्ही आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी खनिज क्षमतेचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये खनिज साठे आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून संशोधन केले जात आहे. खाणकाम व्यवहार्य आणि उत्पादनक्षम बनवण्यासाठी, राज्य सरकारने संयुक्त खाण परवान्याची क्षेत्र मर्यादा २५ वरून १०० चौरस किमीपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आधीच तयार केला आहे.

”राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरची ही चांगली गोष्ट आहे. मी खनिकर्म मंत्री दादा भुसे यांना इतर राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील खाणकामाला चालना देण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यास सांगितले आहे. त्यासाठी मी केंद्राची मदतही मागितली आहे. राज्य आणि केंद्राचे अधिकारी एकत्र बसून त्यासाठी रोड मॅप तयार करतील,” असे त्यांनी नमूद केले.

नॅशनल मिनरल इन्व्हेंटरी डेटानुसार, (Gold Reserves In Sindhudurg) देशात सोन्याच्या धातूचा (प्राथमिक) एकूण साठा अंदाजे 501.83 दशलक्ष टन इतका आहे. यापैकी 17.22 दशलक्ष टन राखीव श्रेणी अंतर्गत आणि उर्वरित 484.61 दशलक्ष टन उर्वरित संसाधन श्रेणी अंतर्गत ठेवण्यात आला आहे. भारतात, सोन्याच्या धातूचे (प्राथमिक) सर्वात मोठे स्त्रोत बिहार (44 टक्के ) मध्ये आहे, त्यानंतर राजस्थान (25 टक्के ), कर्नाटक (21 टक्के), पश्चिम बंगाल (3 टक्के), आंध्र प्रदेश (3 टक्के), झारखंड (3 टक्के) आणि उर्वरित 2 टक्के खनिज स्त्रोत छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथे आहेत. सोन्यासह कोणत्याही खनिजाच्या उत्खननाची किंमत खाणीनुसार वेगवेगळी असते.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button