जुन्या इमारतीतच होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन, मल्टिस्टेट, डेंटल कमिशनसह 16 विधेयके सादर करणार… | पुढारी

जुन्या इमारतीतच होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन, मल्टिस्टेट, डेंटल कमिशनसह 16 विधेयके सादर करणार...

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा:  नवीन संसद भवनाचे बांधकाम लांबत चालल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन सध्याच्या इमारतीतच घेतले जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. येत्या 7 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 23 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात 17 कामकाजी दिवस राहणार आहेत.

अधिवेशनात सरकारकडून 16 विधेयके सादर केली जाणार आहेत. त्यात डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टि स्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान विनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक आदी विधेयकांचा समावेश आहे.

सहकारी संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने  मल्टि स्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक मंजूर करुन घेतले जाणार आहे. डेंटल कमिशन विधेयकामुळे राष्ट्रीय डेंटल कमिशनची स्थापना होईल. तर या कायद्यामुळे डेंटिस्ट कायदा 1948 संपुष्टात येणार आहे.

Back to top button