श्रावण महिना विशेष : हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र | पुढारी

श्रावण महिना विशेष : हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र

आंबोली; निर्णय राऊत : श्रावण महिना सुरू झाला की सर्व शिवभक्त श्रावणी सोमवारी तथा संपुर्ण महिना शिव आराधना, शिवपूजा आदी मोठ्या भक्ती भावाने करतात. तसेच पवित्र शिवस्थानांवर (मंदिर/तीर्थक्षेत्र) दर्शनास असंख्य भाविकांची गर्दी पाहायला मिळते. असेच एक महादेवाचे पवित्र स्थान समजले जाणारे आंबोलीतील ‘हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र’ होय! आता श्रावण महिना सुरू झाल्याने हजारो शिव भक्त पवित्र हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र येथे दाखल होण्यास सुरूवात झालेली आहे. त्यानिमित्त छोटासा आढावा!

आंबोली आणि आंबोली परिसर हा जणू स्वर्गीयच ठिकाणाची अनुभूति देत असते. मनमोहक आकर्षित करणारे देखावे, जैवविविधता, दऱ्या, डोंगर, जंगल, धार्मिक स्थळे, नद्या आणि बरच काही. अश्याच या आंबोलीच्या डोंगारातून निसर्गाच्या सानिध्यात पवित्र हिरण्यकेशी नदीचा गुहांमधून उगम झालेला असून पूर्व दिशेतून हा उमग स्थान असल्याने तसेच उगम स्थानातच पवित्र शिवलिंग आणि नंदी विराजमान असून सोबत गणपती व हिरण्यकेशी देवीची मूर्ति आहेत. पावसाळ्यात स्वयंम नदीच शिवपिंडीला अभिषेक करते, असेच काही. पूर्ण पाण्यामधे महादेवांची पिंडी असते तेच पाणी अभषेक करून पुढे जलकुंडात येते तसेच संपुर्ण नदीत मिळते. त्यामुळे अजुनच या पवित्र स्थानाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. हे शंकरांचे पवित्र आणि जागृत स्थान अशी सुद्धा ओळख आहे. या नदी पात्रात सुद्धा अनेक विविध ठिकाणी पवित्र देवस्थाने आहेत. येथे महादेवांचे पवित्र स्थान असल्याने शिवभक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनास येत असतात. भाविक येथील पवित्र जलकुंडात स्नान करून महादेवांचे दर्शन घेतात. येथेच उगमस्थानपासून काही अंतरावर अस्थी विसर्जन सुद्धा केले जाते. पूर्वकाळी हा भाग ‘काशी’ नावाने सुद्धा ओळखला जायचा तर येथे अस्थि विसर्जन केल्याने पुण्य मिळते, अशी अख्यायिका सांगितले जाते.

याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. तर श्रावण महिण्यात दर सोमवारी तसेच इतर दिवशी सुद्धा येथे असंख्य भाविक व पर्यटक भेट देतात. या परिसरात दाखल होताच पवित्रतेची अनुभुति येते. आता श्रावण महिना सुरू झाला असून विविध ठिकाणांहुन असंख्य भाविक येथे दाखल होत आहेत. नदीतून पवित्र प्रवाहित होऊन आलेल्या पाण्यात (जलकुंडात) स्नान करून आपल्या प्रिय महादेवांचे दर्शन घेतात. याठिकाणाचे अद्यापही पावित्र आणि महत्व राखले गेले असून स्थानाची रक्षा आणि पावित्र हे महादेवच जणू करतात अशी देखील अख्यायिका आहे.

हिरण्यकेशी नदीचा उगम पूर्व दिशेला असून संगम सुद्धा पंचगंगा / कृष्णा येथे पूर्व दिशेला होतो. म्हणून या नदिला पूर्ववाहिनी नदी संबोधले जाते. याच हिरण्यकेशी नदी पात्रात आजरा (जि.कोल्हापुर) येथे पवित्र शिवमंदिर सह राम मंदिर असून वनवासाच्या वेळी काही काळ श्रीराम, सीता व लक्ष्मण यांनी वास केलेला आहे अशी अख्यायिका आहे. म्हणून त्या ठिकाणाला ‘रामतीर्थ’ असे नाव पडले आहे. प्रभु रामचंद्र यांचे पदस्पर्श हिरण्यकेशीस झाल्याचे सांगितले जाते. या पंचक्रोशितील असंख्य लोक याच हिरण्यकेशी नदीवर अवलंबून आहेत. शेतीसह रोजगार सुद्धा या नदीमुळे उपलब्ध होत आहे. म्हणून या नदीला जीवदायिनी सुद्धा म्हटले जाते.

अशी आहे हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र बद्दल अख्यायिका

पूर्वीच्या काळी आंबोली हा मोठा घनदाट ‘अरण्य’चा परिपूर्ण असा भाग होता. त्याकाळी गावात कोणाचेही निधन झाल्यावर शक्य तसे अस्थी विसर्जन करिता याच घनदाट अरण्यातून चालत काशी येथे लोक जायचे! एके दिवशी आपल्या आई – वडिलांची अस्थी विसर्जनासाठी घेऊन ‘पेंडसे’ नामक गुरूजी पायी याच अरण्यातुन काशीला जात असताना ते थकल्याने काही आराम करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तेथे एका महापुरुषाचे त्यांना दर्शन झाले अन, ते महापुरूष त्यांना म्हणाले, तुझा येथेच काशी तीर्थक्षेत्र असताना तू एवढ्या दूरच्या काशीला जातोस! असे शब्द त्यांच्या काणी पडले अन पुढे त्यांना येथील काशी तीर्थक्षेत्र जे आताचे हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र याचे वर्णन केले. त्यानंतर पेंडसे गुरूजी यांनी त्याच अरण्यात शोधा शोध चालू केल्यास त्यांना महापुरुषाने वर्णन केलेल्या प्रमाणे, जंगलात डोंगरातून गुहांमधून पवित्र नदीचा उगमस्थान आढळून आले. तसेच त्याच गुहेच्या मुखात पवित्र शिवलिंग आणि नंदी सुद्धा पाण्यात आढळून आले. त्यांनी तेथे दर्शन घेतले, आपल्या आई-वडिलांच्या अस्थीचे विसर्जन केले आणि गावात येवून घडलेला प्रसंग गावातील व्यक्तींना जसास तसा सांगितला. गावातील ग्रामस्थ तेथे जात जणू त्यावेळी अद्भुत घटना पाहिली. पवित्र नदी, त्यात शिवलिंग आणि तो परिसर. तेथे साफसफाई करून देवस्थानाची पूजा आणि इतर धार्मिक कार्य सुरू झाली. त्यावेळीचे ते अरण्य आणि काशीला अस्थी विसर्जन करायचे म्हणून काशी यांच्या जोडाने अरण्यकाशी तीर्थक्षेत्र जे पुढे हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र नावाने आता ओळखले जाते. याची अख्यायिका अशी सांगितली जाते.

या ठिकाणी येणाऱ्या भाविक तान तनावातून मुक्त होतात. याठिकाणचे पावित्र अद्यापही पूर्वी प्रमाणेच आहे. येथे हिरण्यकेशी नदी देवीची मूर्ति स्थापना सावंतवाडीतील पोकळे नामक भक्ताकडून गावातील ग्रामस्थां मार्फत झाली. त्याआधी पवित्र शिवलिंग आणि नंदी येथे विराजमान होते. आता श्रावण महीना सुरू झाल्याने शिवभक्त, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत असून आयुष्यात सर्वांनी किमान एकदा येथे येवून महादेवांचे दर्शन घ्यावे, येथील जलकुंडात स्नान करूण स्वत: पावित्र्य अनुभवावे.

Back to top button