सिंधुदूर्ग : पर्यटकांची स्कूबा डायव्हिंगची नौका पलटून दोघांचा मृत्यू, १६ जण वाचले; बोटीत सहा मुलांचा समावेश | पुढारी

सिंधुदूर्ग : पर्यटकांची स्कूबा डायव्हिंगची नौका पलटून दोघांचा मृत्यू, १६ जण वाचले; बोटीत सहा मुलांचा समावेश

मालवण ;पुढारी वृत्तसेवा

तारकर्ली पर्यटन केंद्रामोरील समुद्रात पर्यटकांची नौका पलटी होऊन झालेल्या अपघातात २ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १६ पर्यटक सुदैवाने बचावले. ही घटना मंगळवारी (दि.२४) दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली. पाण्यात असलेली बोट अचानक पलटल्याने बोटीतील २० पर्यटक पाण्यात फेकले गेले. यात सहा लहान मुलांचा समावेश होता. अत्यवस्थ पर्यटकांना तत्काळ रुग्णवाहिकेतुन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर अन्य एका महिला पर्यटकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. सुदैवाने या दुर्घटनेतील सहा लहान मुलांचा जीव वाचला आहे.

मुंबई, पुणे, अकोला तसेच अन्य भागातील काही पर्यटक महिला लहान मुलांसह तारकर्ली येथील समुद्रात स्कूबा डायव्हिंग करण्यास गेले होते. स्कुबा डायव्हिंग करून परतत असता, किनाऱ्यापासून शंभर मीटर अंतरावर स्कुबा डायव्हिंगची बोट अचानक पलटी झाली, त्यामुळे या बोटीवरील सर्व महिला पर्यटक व लहान मुले पाण्यात फेकले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे किनारपट्टी भागात खळबळ उडाली.

समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या सर्वांना किनाऱ्यावर आणण्यात आले. यात अत्यवस्थ बनलेल्या पर्यटकांना तत्काळ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेताना, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य एक महिला पर्यटक गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेत २ ते ६ वयोवर्षाची मुले पाण्यात फेकली गेली होती. या मुलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
तारकर्ली पर्यटन केंद्र समोरील समुद्रात स्कुबा डायव्हिंगची बोट पलटी झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पर्यटक, व्यवसायिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचलत का ?

 

Back to top button