सिंधुदुर्ग : गतीरोधक न दिसल्याने दुचाकीचा अपघात; महिला ठार | पुढारी

सिंधुदुर्ग : गतीरोधक न दिसल्याने दुचाकीचा अपघात; महिला ठार

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलावर देवगडकडे जाणाऱ्या मार्गाच्या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण कडून अचानक गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.१७) दुपारी रस्त्यावर कोणतेही पट्टे किंवा सूचनाफलक न लावता हे गतिरोधक करण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारात गतिरोधक न दिसल्याने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली मसुरे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताला जबाबदार कोण ?असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत गतिरोधक काढत नाही, तो पर्यंत रास्तारोको करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे. सदर महिला लग्नानिमित्त कासार्डे येथे जात होती. रात्री उशिरापर्यंत रास्तारोको सुरूच होता. यामुळे मोठया प्रमाणात वाहने महामार्ग व सर्व्हीस रोडवर अडकून पडली होती.

Back to top button