नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, दिलासा मिळणार की 'अवजड' कारवाई अटळ ? | पुढारी

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, दिलासा मिळणार की 'अवजड' कारवाई अटळ ?

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. नितेश राणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात स्वतः हजर झाले होते. त्यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज (ता.३१) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राजकीय क्षेत्रासह सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांचा स्वीय सहाय्यक कणकवली पोलीसांत हजर झाले आहेत.

कणकवलीत रेल्वे स्टेशननजीक १८ डिसेंबर रोजी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांनी आ. नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आ. राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळताच त्यांनी सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळत त्यांना दहा दिवसांत जिल्हा न्यायालयात हजर व्हावे, असे आदेश दिले होते. तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असा दिलासाही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला होता.

आ. राणे गेल्या शुक्रवारी जिल्हा न्यायालयात दाखल झाले होते. आ. राणे जिल्हा न्यायालयात हजर झाल्यावर दोन्ही बाजूच्या वकीलांनी आपले म्हणणे मांडले होते. याप्रकरणी आज सुनावणी होऊन निर्णय होणार आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button