Dapoli nagar panchayat election : दापोली नगर पंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता | पुढारी

Dapoli nagar panchayat election : दापोली नगर पंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. या निवडणुकीत १७ पैकी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान शिवसेनेतील काहींनी राष्ट्रवादी आणि शिवसेना मान्य नसल्याचे जाहीर करून बंडखोरी केली होती. ही बंडखोरी शिवसेनेच्या सुर्यकांत दळवी यांच्याविरोधात केली होती. परंतु दळवींनी आपले अस्तित्व टिकवत शिवसेनेला पुन्हा उभारी दिली आहे. (Dapoli nagar panchayat election)

ही झालेली आघाडी आम्हाला मान्य नाही. असा उघड विरोध शिवसेनेतील काही मंडळींनी केला. तर सुर्यकांत दळवी यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही म्हणून अनेकांनी शिवसेनेतच बंडखोरीची वेगळी चूल मांडली होती.

मात्र, नुकत्याच झालेल्या दापोली नगर पंचायत निवडणुकीत दापोलीत शिवसैनिकांनी दळवींचे नेतृत्व मान्य करून आघाडीला एक हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे आगामी काळात सुर्यकांत दळवी यांचा दापोलीत राजकीय करिष्मा चालणार असल्याचे बोलले जात आहे.

Dapoli nagar panchayat election : सुर्यकांत दळवींनी सिद्ध करून दाखवले

२५ वर्ष शिवसेनेत सत्तेत राहून मागील सात वर्ष सुर्यकांत दळवी यांना पक्षाअंतर्गत बाजूला सारले होते. याकाळात दापोली मतदारसंघात माजी मंत्री रामदास कदम यांचे वर्चस्व होते. आमदार योगेश कदम यांनी देखील दापोलीत दळवी यांना बाजूला सारून आपले राजकीय बस्तान टिकविण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर दापोलीच्या राजकारणात शिवसेनेअंतर्गत नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यानंतर शिवसेना पक्षश्रेष्ठीने काही अधिकार हे सुर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवल्या होत्या.

दरम्यान, झालेल्या निवडणुकीत दापोलीमध्ये दळवी आणि आमदार योगेश कदम अशी दुफळी दिसली. या निवडणुकीत आमदार योगेश कदम यांना मानणाऱ्या अनेक शिवसैनिकानी पक्ष निर्णयाविरोधात जाऊन बंडखोरीची पावित्रा घेतला.

शिवसेनेतील ही बंडखोरी आघाडीला जड जाईल असे वाटले होते. मात्र दापोली नगर पंचायत निवडणुकीत अनेक नागरिकांनी पक्ष बघत मतदान करून शिवसेना आघाडीचा धुवा उडविला. त्यामुळे आगामी काळात दापोलीत राजकीय समीकरणे बदलताना दिसले आहेत.

Back to top button