ब्रिटनवर येणार एका भारतीयाचे राज्य! पंतप्रधान म्हणून ऋषी सुनाक यांना पसंती | पुढारी

ब्रिटनवर येणार एका भारतीयाचे राज्य! पंतप्रधान म्हणून ऋषी सुनाक यांना पसंती

लंडन ; वृत्तसंस्था : ब्रिटिशांनी भारतावर बंदुकीच्या बळावर दीडशे वर्षे राज्य केले, आता एक भारतीय दस्तुरखुद्द ब्रिटनवर सेवेच्या बळावर राज्य करणार असल्याचे संकेत मिळत आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा म्हणून दबाव वाढतच चाललेला आहे. जॉन्सन यांच्या जागी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक हे पहिली पसंती म्हणून या देशाच्या राजकीय पटलावर उदयाला आले आहेत!

कोरोना लॉकडाऊनदरम्यान ओल्या पार्टीमुळे जॉन्सन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. संसदेत क्षमायाचनेनंतरही कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या (हुजूर पक्ष) दहापैकी 6 सदस्यांनी जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जॉन्सन यांची लोकप्रियता 36 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या पोल सर्व्हेत 46 टक्के लोकांनी ऋषी सुनाक यांना पंतप्रधान म्हणून पहिली पसंती दिली आहे. जॉन्सन मंत्रिमंडळात सध्या गृह खाते सांभाळणार्‍या प्रीती पटेल यांना पंतप्रधान पदासाठी दुसर्‍या क्रमांकाची (10 टक्के) पसंती आहे, हे आणखी विशेष!

सुनाक यांना पंतप्रधानपदी नेमले तर 2024 मध्ये होणार असलेल्या सर्वसाधारण निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला जास्त जागा जिंकता येतील, असे पक्षाला वाटते. जुलै 20 मध्ये जॉन्सन लोकप्रियतेच्या शिखरावर होते. तेव्हा झालेल्या सर्व्हेत त्यांना 85 टक्के मतदारांचा पाठिंबा होता. आता झालेल्या सर्व्हेत मात्र मतदारांना ते नको आहेत. त्याऐवजी ऋषी सुनाक हवे आहेत.

बँकर म्हणून आपली कारकीर्द सुरू करणार्‍या ऋषी यांनी 2015 मध्ये पहिली निवडणूक लढविली. उत्तर यॉर्कशायरमधील रिचमंड मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.

कमला हॅरिसनंतर ऋषी की प्रीती?

अमेरिकेसारख्या महासत्तेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय मूळ असलेल्या कमला हॅरिस यांची निवड झाल्यानंतर ऋषी वा प्रीती यांच्यापैकी कुणी ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर नियुक्त झाल्यास ती भारतासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट ठरणार आहे.

पंतप्रधानपदाची दुसरी दावेदारही मूळ भारतीय

बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास ब्रिटनच्या विद्यमान गृहमंत्री प्रीती पटेल याही पंतप्रधानपदाच्या दावेदार ठरू शकतात. विथम मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. गुजराती मूळ असलेल्या सुशील पटेल आणि अंजना यांच्या त्या कन्या आहेत.

Back to top button