

पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव हे पाकिस्तान निर्मितीच्या मागणीपासून ते स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीच्या कालखंडाचे एक द्रष्टे संपादक या नात्याने साक्षीदार होते. त्यांनी फाळणीचा कालखंड जवळून पाहिला होता. पाकिस्तानच्या निर्मिती प्रक्रियेवेळी त्यांनी सातत्याने अनेक संपादकीयातून धर्माच्या आधारे नवे राष्ट्र उभारण्यास विरोध केला होता. धर्माधिष्ठित राष्ट्रे आर्थिक आघाड्यांवर सक्षमपणे उभा राहू शकत नाहीत, हे त्यांचे मत पाकिस्तानच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले आहे. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी रेटणारे ‘भस्मासुर’ तयार करत आहेत, असा इशारा पाऊणशे वर्षांपूर्वी त्यांनी दिला होता. आज या ‘भस्मासुरा’ने दहशतवादाच्या रूपात मांडलेला उच्छाद पाहता ग. गो. जाधव किती दूरद़ृष्टी असलेले संपादक होते, याची साक्ष पटते. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त विशेष लेख...
पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा आवाका विलक्षण होता. विशेषतः भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंधांवर त्यांनी अतिशय नेमकेपणाने वेळोवेळी भाष्य केले होते. पाकिस्तानचा एक राष्ट्र म्हणून उदय होत असतानाचा कालखंड त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून काळजीपूर्वक अभ्यासला होता. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती प्रक्रिया आणि त्या काळात ग. गो. जाधव यांनी मांडलेली मते व भूमिका विचारात घेणे क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे आजच्या काळातही त्यांची सात दशकांपूर्वी मांडलेली सर्वच्या सर्व मते व भूमिका प्रासंगिक तितकीच कालसुसंगत असल्याचे सिद्ध होते. यातून त्यांची भविष्याकडे पाहण्याची सक्षम द़ृष्टी समोर येते.
भारतापासून पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर पाकिस्तानला ‘स्वराज्य’ मिळाल्याचा आनंद झाला असला, तरी त्याचे ‘सुराज्या’त रूपांतर करणे त्या देशाला शक्य होणार नाही, हे ग. गो. जाधव यांनी 10 जून 1947 मध्येच स्पष्ट केले होते. पाकिस्तानची बिघडलेली अंतर्गत स्थिती विचारात घेतली, तर प्रत्यक्षात भारताशी तुलना करता पाकिस्तान आज स्पर्धेत कुठेच नाही. ग. गो. जाधव यांना ही बाब 78 वर्षांपूर्वी उगमली होती, म्हणून ते द्रष्टे संपादक ठरतात. धर्माच्या आधारावर देश उभारणे ग. गो. जाधव यांना मान्य नव्हते. धर्म ही वेगळी बाब आहे. देशासाठी परस्पर सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य हवे असते. पाकिस्तान अशा प्रकारचे सामंजस्य आणि सहकार्य मिळविण्यात अपयशी ठरेल, हे भाकीत त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीवेळीच केले होते. ‘स्वराज्य संपादनाची भूक भागताच त्या देशासमोर सुराज्य संपादनाची भूक ‘आ वासून’ उभी राहील. या प्रश्नाचा धार्मिक भागापेक्षा आर्थिक भाग खूप महत्त्वाचा आहे. यासाठी परस्पर सहकार्य नितांत आवश्यक आहे,’ हे ग. गो. जाधव यांचे भाष्य आजच्या घडीला शंभर टक्के खरे ठरले आहे.
पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला असून, सामान्य जनता अन्नाला मोताद होत असल्याची स्थिती आहे. पाकिस्तान आर्थिक आघाडीवर सपशेल कोलमडला असून, तो भारताच्या कोसो दूर आहे. भारताशी परस्पर सहकार्य केल्यास पाकिस्तानची आर्थिक घडी बसू शकेल, असा ग. गो. जाधव यांचा आशावाद होता. मात्र, पाकिस्तानने सुरुवातीपासूनच भारताशी वैर धरले. भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यासाठी पाकने स्वतःच्या देशातील नागरिकांना आर्थिक खाईत लोटले. कायद्याच्या राज्यापेक्षा धर्माधिष्ठित व्यवस्थेला पाकिस्तानने प्राधान्य दिले. परिणामी, पाकिस्तानची स्थिती भयंकर बनली. पाकिस्तानने भारताचा हात सोडू नये, असे ग. गो. जाधव यांचे मत किती महत्त्वपूर्ण होते, हे यातून दिसते. ‘हिंदुस्थानशी समझोत्याचे धोरण ठेवल्याशिवाय पाकिस्तानला गत्यंतर नाही,’ इतक्या स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका किती रास्त होती, हे प्राप्त परिस्थितीत संपूर्ण जगाच्या समोर आहे.
मुस्लिम लीगच्या मागणीवरून हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. या फाळणीतून ‘भस्मासुर’ तयार होईल, असा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. हा शब्द पुढच्या काळात खरा ठरला. पाकपुरस्कृत ‘जिहादी भस्मासुरा’चा भारत गेली अनेक वर्षे मुकाबला करत आहे. ‘राजकीय हेतूने आणि धर्मवेडाने भडकावलेले हेे गुंड आता पुढार्यांच्या ताब्यात राहतील आणि त्यांची आज्ञा मानतील, असे वाटत नाही. हा भस्मासुर निर्मात्यावरदेखील उलटतो,’ हे ग. गो. जाधव यांचे विधान किती चपखल होते, याची पदोपदी साक्ष पटते. पाकिस्तानने दहशतवादाचा तयार केलेला ‘भस्मासुर’ पाकिस्तानवरच उलटलेला आहे. क्वचित एखादाच दिवस जातो की जेव्हा पाकिस्तानात बॉम्बस्फोट किंवा दशतवादी कृत्य होत नाही. यातून ग. गो. जाधव यांनी पाकिस्तानची निर्मिती होत असतानाच ‘भस्मासुर तयार करणार्यावरही उलटतो’ हा दिलेला इशारा किती महत्त्वपूर्ण होता, याची जाणीव होते.
पाकिस्तानने धर्माच्या आधारावर राष्ट्रनिर्मिती केली खरी; पण हा देश अन्य धर्मीयांच्या बाबतीत कधीच सहिष्णू राहिला नाही. पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात अनेक हिंदू आणि शीख धर्मीयांवर अत्याचार झाले होते. याची दखल ग. गो. जाधव यांनी ‘पाकिस्तानातून अल्पसंख्याकांचे उच्चाटन’ या अग्रलेखात घेतली होती आणि भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील स्थितीची तुलना केली होती. ‘हिंदुस्थानात असे अनेक प्रांत दाखवता येतील की जिथे हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने राहत आहेत व अल्पसंख्याकांचे हितसंरक्षण केले जात आहे. परंतु, असे उदाहरण पाकिस्तानातील एकाही प्रांतात दाखवता येत नाही. पाकिस्तानातून आज ना उद्या सर्व अल्पसंख्याकांना चंबूगबाळे आवरून हिंदुस्थानाची वाट धरावी लागेल,’ हे ग. गो. जाधव यांचे भाकीत नंतरच्या काळात अगदी खरे ठरले. पाकिस्तानत अल्पसंख्याकांवर होत असलेले अत्याचार पाहता याची साक्ष वारंवार पटते.
भारत-पाकिस्तान दरम्यान काश्मीर प्रश्न कळीचा मुद्दा आहे. या प्रश्नाचाही ऊहापोह ग. गो. जाधव यांनी केला होता. काश्मीर प्रश्नाबाबत त्यांनी मांडलेले मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. विशेषतः तत्कालीन केंद्र सरकारने काश्मीर प्रश्न हलक्यात घेऊ नये आणि तो प्रलंबितही ठेवू नये, अशी सूचना त्यांनी 1 नोव्हेंबर 1947 मध्येच केली होती. काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून अनेक कुरघोड्या सुरू होत्या. किंबहुना आफ्रिकी टोळ्यांना फूस लावून पाकिस्तान त्या काळात काश्मीरमध्ये उपद्रव माजवत होता. ‘हिंदुस्थान सरकारच्या दुबळ्या धोरणामुळे पाकिस्तानला शिरजोर होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानला वेळीच पायबंद न घातल्यास जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल,’ असा इशारा ग. गो. जाधव यांनी दिला होता. काश्मीर प्रकरणात तत्कालीन सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी होती, असे त्यांचे मत होते. सरकार कडक भूमिका घेत नसल्याने ‘काश्मीर प्रकरण रंगणार’ या नावाने त्यांनी सणसणीत अग्रलेख लिहून तत्कालीन सरकारला धारेवर धरले होते. धोरणात्मक पातळीवर कठोरपणा नसल्याने काश्मीर प्रश्न लोंबकळत राहील, असे भाष्य त्यांनी केले होते आणि आजही आपण त्याची प्रचिती घेत आहोत.
मुस्लिम लीग आणि बॅरिस्टर जिना यांनी हिंदुस्थानपासून पाकिस्तान वेगळा करण्याची मागणी रेटल्यानंतर प्रत्येक वेळी ग. गो. जाधव यांनी अखंड हिंदुस्थानचा आग्रह धरला होता. पाकिस्तानची निर्मिती ही अखंड हिंदुस्थान संकल्पनेच्या विरुद्ध असून ग. गो. जाधव यांना या द्विराष्ट्राच्या प्रयोगाचे धोके माहीत होते. ‘अखंड हिंदुस्थानचा अंत’ या अग्रलेखात त्यांनी ‘पाकिस्तान भारतापासून वेगळा होण्याने अखंड हिंदुस्थानचे स्वप्न भंग पावले असे खेदाने नमूद करावे वाटते,’ अशी भूमिका मांडली होती. पाकिस्तानची निर्मिती भावनिक मुद्द्यांवर होत आहे. मुस्लिम लीग धर्माचा मुद्दा समोर करून स्वतंत्र राष्ट्राच्या भूमिकेचे समर्थन करत होती. धर्म हा मुद्दा राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा असू शकत नाही, असे ग. गो. जाधव यांचे मत होते. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाल्यास भविष्यात भाषा आणि भौगोलिक सलगता या मुद्द्यावरही काही प्रदेश स्वतंत्र होण्याची मागणी करतील, हा धोका ग. गो. जाधव यांनी अगदी सुरुवातीला लक्षात आणून दिला होता. विशेषतः पाकिस्तानची मागणी रेटणार्या नेत्यांना त्यांनी आधीच सावध केले होते. ‘पाकिस्तान हे आयुष्यध्येय ठरवून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणार्या महाभागांना आज आपले ते ध्येय सफल झाल्याचे समाधान वाटत असेल; पण त्यांच्यावर पडलेली जबाबदारी त्यांना यापुढील काळात भेडसावणार आहे,’ असा इशारा ग. गो. जाधव यांनी पाकिस्तानचा पुरस्कार करणार्या नेत्यांना दिला होता.
पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच हा देश अस्थिर आणि आर्थिक पातळ्यांवर कमकुवत राहिला आहे. भारताशी स्पर्धा करण्याच्या नादात पाकिस्तानी नेतृत्वाने आपल्या देशाच्या प्राधान्यक्रमांवर पुरेसा विचार केला नाही. भारतद्वेषाने पछाडलेल्या या राष्ट्राची उत्तरोत्तर अधोगती होत गेली. ग. गो. जाधव यांनी पाकिस्तान निर्मितीच्या टप्प्यातच या सर्व धोक्यांची जाणीव करून दिली होती. या धोक्यांकडे लक्ष पुरवून पाकिस्तानने भारताशी संघर्ष न करता सामंजस्याची भूमिका घेतली असती, तर जगाच्या पटलावर भारताप्रमाणेच पाकिस्तानचे नावही अग्रक्रमाने घेतले गेले असते. सात दशकांपूर्वी ग. गो. जाधव यांनी केलेले भाष्य आज जसेच्या तसे खरे होत आहे. एखादा संपादक काळाच्या पुढे जाऊन कसा आणि किती अचूक पाहू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे तसेच पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक आहेत.)