जालना : अरे येथे कचरा करू नको रे बाबा; अजित पवारांकडून कार्यकर्त्याची कानउघडणी | पुढारी

जालना : अरे येथे कचरा करू नको रे बाबा; अजित पवारांकडून कार्यकर्त्याची कानउघडणी

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक दौऱ्यात अजित पवारांच्या शिस्तीचा परिचय आल्याशिवाय राहत नाही. अजितदादा हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत. त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात. असाच अजित पवारांची शिस्त आणि स्वच्छतेबाबतचा प्रत्‍यय आज पुन्हा एकदा आला.

आज (शनिवार) विरोधी पक्षनेते अजित पवार हे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना येथे उपस्‍थित होते. यावेळी या ठिकाणी माजी मंत्री राजेश टोपे यांनी अजित पवार यांचा सत्कार केला. अनेक कार्यकर्ते व तरुण वर्ग भेटण्यासाठी आले होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याने गिफ्ट रॅपरमध्ये दादांचा फोटो सप्रेम भेट दिला. फोटो गिफ्ट रॅपरमध्ये काढून देत असताना कार्यकर्त्याने गिफ्ट रॅपरचा कागद खाली टाकला. एवढ्यात अरे येथे कचरा नको करू बाबा असे म्हणत, अजितदादा यांनी कार्यकर्त्याने खाली फेकलेला गिफ्ट रॅपरचा कागद स्वतः उचलून तो हातात घेतला व बाजूला करून स्वच्छता ठेवण्याबाबत कार्यकर्त्याला सांगितले.

त्याच बरोबर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकर्ते फोटो काढण्यासाठी उभे राहिले असता, ढकलाढकली झाली एवढ्यात अजित पवार म्हणाले, अरे काय हा युवावर्ग थोडी सुद्धा शिस्त नाही, कस रे असं म्हणत शिस्तीबद्दल युवा कार्यकर्त्यांची कान उघडणी केली.

अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना अजित पवारांनी कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला असताना त्यांनी स्वतः कचरा उचलत बाजूला केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखाना अंकुशनगर येथील कार्यक्रमात हा प्रत्‍यय पुन्हा एकदा आला.

हेही वाचा : 

Back to top button