अतिवृष्टीला कंटाळून पारडगांव येथील तरुण शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी

अतिवृष्टीला कंटाळून पारडगांव येथील तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

घनसावंगी ; पुढारी वृत्तसेवा : शेतीची सततची नापिकी व अतिवृष्टीला कंटाळून घनसावंगी तालुक्यातील पारडगांव येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हि घटना दि. ८ रोजी बुधवारी दुपारी घडली. तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पारडगांव येथील बाबासाहेब आसाराम तोडेकर (वय ३८ वर्षे) हे शेतकरी शेती करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु शेतीच्या सततच्या नापिकीमुळे व अतिवृष्टीमुळे ते मानसिक तणावात होते. त्यातच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली.

बाबासाहेब तोडेकर हे कुटुंब प्रमुख असल्याने शेतीची नापिकी व अतिवृष्टीमुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल या चिंतेने मानसिक तणावात होते. त्यामुळे शेतीची नापिकी व अतिवृष्टीला कंटाळून बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पाडगांव येथील विहिरीत उडी घेऊन बाबासाहेब तोडेकर यांनी आत्महत्या केली.

पोलीस पाटील भारत काळे यांनी या घटनेची माहिती घनसावंग पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच रांजणी चौकीचे पोलिस जमादार रामचंद्र खलसे व विनोद देशमाने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस जमादार रामचंद्र खलसे, विनोद देशमाने व अडियाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यासंदर्भात पोलीस पाटील भारत काळे यांने दिलेल्या माहिती वरून घनसावंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस जमादार रामचंद्र खलसे करीत आहेत.

मयताचा पोस्टमार्टम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे, रामजीवन शर्मा, अशोक खुळे व स्वप्निल मडावी यांनी परिश्रम घेतले. यावेळी रांजणीचे सरपंच अमोल देशमुख तसेच उपसरपंच शेख रहीम यांनी सहकार्य केले.

Back to top button