

Indurikar Maharaj news controversy viral video daughter trolls quit kirtan: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सोशल मीडियावरील व्यक्तिगत टीकांमुळे अखेर कीर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच त्यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला होता. त्या समारंभातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर काही लोकांनी मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स केल्या आणि यामुळे महाराज संतापले आहेत.
एका व्हिडिओत इंदुरीकर महाराज भावनिक होत म्हणाले, “लोक आता इतके खालच्या पातळीवर गेलेत की माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स करत आहेत. तुम्ही मला शिव्या द्या, मला घोडे लावा, पण माझ्या लेकरांवर बोलू नका. आयुष्यभर लोकांची सेवा केली, चांगलं केलं पण आता वैयक्तिक आयुष्यावर येऊन ठेपलंय.”
महाराजांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाने कधीच प्रसिद्धीचा मोह ठेवला नाही, पण काही सोशल मीडियावरील लोकांनी त्यांच्या घरातील खासगी प्रसंगावरून चुकीच्या बातम्या आणि कमेंट्स केल्या, ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला.
इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले, “31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना मार्गदर्शन केलं, पण आता कंटाळलो आहे. मी दोन-तीन दिवसात मोठा निर्णय घेणार आहे. माझ्यात अजून उत्तर द्यायची ताकद आहे, पण आता हे सगळं माझ्या घरा पर्यंत पोहचलं आहे.”
इंदुरीकर महाराज म्हणाले, “मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला, पण मला आता शांतता हवी आहे. माझ्या लेकरांच्या कपड्यांवर बोलणाऱ्यांना तरी लाज वाटली पाहिजे. आता मी काही दिवसांत निर्णय घेईन''
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महाराजांना पाठिंबा दिला. अनेक नेटिझन्सनी म्हटलं की, ''महाराज तुम्ही सत्य तेच बोलतात. लोकांनी कपडे आणि तुम्ही किती खर्च केलेला ते बघितलं सर्व पण तुम्ही खाली पंगत बसवली होती. नाचत गाजत भजन करत होते. ते कोणी नाही बघितले. लोक देवालाही नाव ठेवतात मग आपण काय आहोत. परंतु एक गोष्टीचा खूप वाईट वाटतं की कुठल्याही आई बहिणींवर आम्ही अपशब्द बोलताना आम्ही आमची संस्कृती आमच्या छत्रपतींचा इतिहास विसरून जातो.''
काहींनी सोशल मीडियावर विनंती केली, “महाराज तुम्ही कीर्तन बंद करण्याचा निर्णय घेऊ नका वाईट प्रवृत्तीचे लोक या समाजात खूप आहेत. तुमची मुलगी तुमच्या शब्दाला मान देऊन आणि चांगले संस्कार घडल्यामुळे तुमच्या डोळ्यांदेखत तुमच्या समोर तिचा साखरपुडा झाला हे काहींना बघवत नाही. वाईट कमेंट करणाऱ्यांच्या घरात संस्कार नाहीत.”