Eknath Shinde: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा ‘दबदबा’! फाडफाड इंग्रजीत भाषण, ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमलं हाऊस ऑफ लॉर्ड्स

Eknath Shinde UK Parliament Speech: ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Eknath Shinde UK Parliament Speech
Eknath Shinde UK Parliament SpeechPudhari
Published on
Updated on

Eknath Shinde UK Parliament Speech: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनच्या संसदेत आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना ‘Commonwealth Public Leadership Recognition’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी केली.

या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची ओळख करून देताना शिंदे यांनी मराठी भाषेचा अभिमानही व्यक्त केला. आपल्या भाषणात त्यांनी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या कवितेचा संदर्भ देत मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रातील विकासकामे, महिला सक्षमीकरण आणि नागरिक-केंद्रित प्रशासन याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

आई आणि पत्नीच्या कष्टांचा आवर्जून उल्लेख

आपल्या सार्वजनिक जीवनाची जडणघडण सांगताना एकनाथ शिंदे यांनी आई आणि पत्नीच्या कष्टांचा विशेष उल्लेख केला. सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला समाजातील सर्वसामान्यांच्या अडचणी जवळून समजतात आणि त्यातूनच लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते, असे मुद्दे त्यांनी मांडले. या उल्लेखाला उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली.

‘लाडकी बहीण’ योजनेचा लंडनमध्ये उल्लेख

शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा विशेष उल्लेख केला. ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी राज्य सरकारने विविध पातळ्यांवर काम केल्याचेही त्यांनी नमूद केले. या योजनेची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

‘शासन आपल्या दारी’चा दाखला

नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकास म्हणजे केवळ मोठे रस्ते, पूल आणि इमारती उभारणे नव्हे, तर त्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मते, प्रशासनाचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिक असला पाहिजे. याच विचारातून नागरिक-केंद्रित आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देण्यात आले.

महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याच्या नव्या संधी

महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील आर्थिक आणि औद्योगिक सहकार्याबाबतही शिंदे यांनी भाष्य केले. मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची जागतिक वित्तीय केंद्रे असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही प्रदेशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे नमूद केले.

फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि ब्रिटनने एकत्र काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde UK Parliament Speech
Rohit Pawar: रोहित पवारांवरून राष्ट्रवादीत नवा वाद? पदाधिकाऱ्याच्या पोस्टने पक्षात चर्चांना उधाण; कार्यकर्त्यांनी विचारला जाब

पायाभूत सुविधांपासून गुंतवणुकीपर्यंत भर

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्याने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध पावले उचलली असून महाराष्ट्र देशातील आघाडीचे गुंतवणूक केंद्र म्हणून पुढे येत असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेचाही उल्लेख केला. महाराष्ट्राने विकासाची गती कायम ठेवत देशाच्या विकासात भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’नेही गौरव

हाऊस ऑफ लॉर्ड्समधील सन्मानासोबतच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित ‘International Conclave 2026’ मध्ये एकनाथ शिंदे यांना ‘Statesmanship Award’ देऊन गौरवण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राबवलेल्या नागरिक-केंद्रित प्रशासन पद्धतीची तसेच विविध कल्याणकारी योजनांची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला ब्रिटनमधील वरिष्ठ राजकीय नेते, संसद सदस्य, महापौर, राजदूत, उद्योगजगतामधील प्रतिनिधी तसेच कॉमनवेल्थ देशांतील विविध मान्यवर उपस्थित होते.

Eknath Shinde UK Parliament Speech
Raj Thackeray: 'राष्ट्रीय पुरस्कार गुजरातमध्येच का?', राज ठाकरेंचा संतप्त सवाल, कलाकारांना केलं मोठं आवाहन

पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला समर्पित

आपल्याला मिळालेला सन्मान हा केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील जनतेचा सन्मान असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणून सुरू केलेल्या योजनांपासून ते उपमुख्यमंत्री म्हणून सुरू असलेल्या कामापर्यंतचा प्रवास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

मराठी भाषेतील अभिमानास्पद सुरुवात, शिवरायांचा जयघोष आणि त्यानंतर इंग्रजीतून केलेले प्रभावी भाषण यामुळे ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची विशेष चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news