

Rohit Pawar Supporters Angry: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडत आहेत. विविध मुद्द्यांवर सरकारविरोधात भूमिका घेत रोहित पवार राज्यभर दौरेही करत आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेला पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून अपेक्षित प्रसिद्धी मिळत नसल्याची नाराजी पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
रोहित पवार सातत्याने शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. विविध दौऱ्यांदरम्यान ते नागरिकांशी संवाद साधत असून सरकारच्या धोरणांवरही टीका करत आहेत. मात्र, रोहित पवार यांच्या या भूमिका आणि दौऱ्यांबाबत पक्षाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकही पोस्ट करण्यात आली नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटत आहेत. महाराष्ट्र सोशल मीडिया उपाध्यक्ष योगेश सावंत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
योगेश सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमदार रोहितदादा पवार गेल्या अनेक काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ठामपणे लढत आहेत. त्यामुळे या वर्गातील अनेकांना ते आपला आवाज वाटत आहेत. मात्र, ते सातत्याने हे मुद्दे मांडत असताना पक्षाच्या सोशल मीडिया पेजवर त्याबाबत पोस्ट केल्या जात नसतील, तर पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून आपल्याला दुःख होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, “पक्षाची सोशल मीडिया टीम रोहितदादांना का अशी वागणूक देत असेल किंवा का सपोर्ट करत नसेल?”, असा थेट सवालही योगेश सावंत यांनी उपस्थित केला आहे.
या पोस्टनंतर पक्षाच्या सोशल मीडिया व्यवस्थापनावरून कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार यांच्याकडून सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात असताना पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया यंत्रणेकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अंतर्गत राजकारणात या नाराजीचे पुढे काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.