Climate Week India 2026: मुंबईपासून नाशिकपर्यंत पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये काय आहे खास?

Climate Week India 2026: २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान क्लायमेट वीक इंडिया २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पर्यावरण आणि हवामान बदलाशी संबंधित कार्यक्रम होणार आहेत.
Climate Week India 2026
Climate Week India 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

Climate Week India 2026: वाढते तापमान आणि हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेता, नागरिकांमध्ये हवामान सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘क्लायमेट वीक इंडिया २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान देशभरात हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, सांगली यांसह विविध शहरांमध्ये स्थानिक संस्था, बचत गट आणि पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या सप्ताहात हवामान बदलावर चर्चा, चित्रपट प्रदर्शन, निसर्गभ्रमंती, स्वच्छता मोहिमा आणि शाश्वत जीवनशैलीबाबत संवाद अशा विविध माध्यमांतून नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

मुंबईत स्वच्छता आणि हवामानावर संवाद

मुंबईत २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ‘क्लीन अप जुहू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी नागरिक एकत्र येऊन जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करणार आहेत. स्नेहित राव, अब्दुल मुनाफ आणि क्लायमेट वीक इंडिया यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम होणार आहे.

याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ‘असर’ संस्थेतर्फे ‘क्लायमेट मिक्सर’ आयोजित करण्यात आला आहे. पॉप कल्चर आणि हवामान बदल यांचा संबंध या कार्यक्रमातून समजून घेतला जाणार आहे.

नवी मुंबईतही २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘विद्यार्थ्यांशी संवाद : हवामान बदलाच्या अनुषंगाने चित्रकला’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. चित्रकलेच्या माध्यमातून हवामान बदल समजून घेण्याबाबत चित्रकार श्रीबा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

पुण्यात कचरा व्यवस्थापनापासून वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंत विविध कार्यक्रम

पुण्यात २९ सप्टेंबर रोजी ‘पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर कार्यक्रम होणार आहे. पर्यावरणात होणारे बदल, त्यामागची कारणे आणि त्यावर वैज्ञानिक पद्धतीने कसे काम करता येईल, याबाबत डॉ. नितीन हांडे मार्गदर्शन करणार आहेत.

३ ऑक्टोबर रोजी औंध येथील मारुतीराव गायकवाड नगरमध्ये ‘SWaCH वेस्ट ट्रेल’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून कचरा गोळा करण्यापासून त्याच्या व्यवस्थापनापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. कचरावेचकांच्या सहभागातून होणाऱ्या या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये कचऱ्याचा शहर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला जाणार आहे.

१ आणि २ ऑक्टोबर रोजी पुण्यात नेचर वॉक आणि फिल्म स्क्रीनिंगचेही आयोजन करण्यात येणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात पदभ्रमण करण्यासोबतच ‘ALTEFF फिल्म क्लब’तर्फे पर्यावरणाशी संबंधित लघुपट दाखवले जाणार आहेत.

Climate Week India 2026
CJP Protest Mumbai: शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनाला ब्रेक; मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली? सांगितली ४ महत्त्वाची कारणं

नाशिकमध्ये नदी, पावसाचे पाणी आणि रानभाज्यांवर भर

नाशिकमध्ये ३ ऑक्टोबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (IMRT) येथे दुपारी १२ वाजता कार्यक्रमांना सुरुवात होईल.

यामध्ये ‘निसर्गकन्या आदिवासी महिला बचत गट’ यांच्या कामाची माहिती देण्यात येणार आहे. तसेच रानभाज्यांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.

‘चला जाणूया नंदिनी नदीला’ हा विशेष उपक्रमही या कार्यक्रमाचा भाग असेल. याशिवाय घराच्या छतावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग कसे करता येईल, याची माहिती देणारे सत्र आयोजित करण्यात आले आहे. वृक्षसंवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कुसमाडी पॅटर्न’ची माहितीही या वेळी देण्यात येणार आहे.

सांगली आणि धुळे-नंदुरबारमध्येही उपक्रम

सांगलीमध्ये निनाद गोसावी यांच्या नेतृत्वाखाली ‘नेचर वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत शामरानगर परिसरात ही प्रभातफेरी होणार आहे.

धुळे-नंदुरबारमध्ये २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान यंग फाउंडेशनतर्फे निसर्ग संवाद शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सातपुड्याजवळील उड्या पाडा येथे हे शिबिर होणार आहे. विशेष म्हणजे हे शिबिर मराठीसोबत स्थानिक पावरी भाषेतही आयोजित केले जाणार आहे.

Climate Week India 2026
Solapur News: ‘टाटा-बिर्ला, अंबानी या अन्...', माढा तालुक्यातील ग्रामस्थांनी गावचं काढलं विकायला; कारण काय? शेतकऱ्यांचं आमरण उपोषण

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ शासन किंवा संस्थांनी प्रयत्न करण्याऐवजी नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आपल्या शहरात आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

क्लायमेट वीक इंडिया २०२६च्या महाराष्ट्रातील कार्यक्रमांची अधिक माहिती आणि नोंदणीसाठी लिंक - https://climateweek.in/

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news