निपाणी ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे जग थांबले; पण शेती व्यवसाय मात्र थांबला नाही. सर्वच क्षेत्रांतील उत्पादन घटले; पण शेती व्यवसायात मात्र दहा टक्क्यांनी वाढ झाली. आता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे गरजेचे असून, राज्य शासनाने सेंद्रिय शेतीचा विकास साधण्यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी केले.
निपाणीत मंगळवारी कृषिमंत्री पाटील, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली 'एक दिवस शेतकर्यांसोबत' हा उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमाची सांगता सायंकाळी जोल्ले पब्लिक स्कूल येथे करण्यात आली. त्यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, समाजाच्या विकासात डॉक्टर, अभियंते, उद्योजक, कारखानदार यांचे योगदान असते; पण अन्नदाता म्हणून संपूर्ण सृष्टीला अन्नपुरवठा करतो तो फक्त शेतकरीच. आजपर्यंत शेतकरी आपल्या समस्या घेऊन विधानसभेपर्यंत जात होता. आता शेतकर्यांच्या दारात विधानसभा आणण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाने शेती विकासाच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. यामुळेच शेतकरी सध्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. निपाणी मतदारसंघात शेती व्यवसायाचे ज्ञान देणारे डिप्लोमा कॉलेज आहे. या भागातील युवकांना शेती व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान घेता यावे, याकरिता कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी निपाणी मतदार संघासाठी डिग्री कॉलेज मंजूर करावे.
खासदार जोल्ले म्हणाले, शेतकर्यांच्या मुलांनी शिक्षणासाठी शासनाने नव्याने सुरू केलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आपले शैक्षणिक प्रगती साधावी. खासदार इराण्णा कडाडी यांनीही मनोगत व्यक्त केले अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामींच्या आशिर्वचनाने सांगता झाली
कृषी संचालक शिवगोंडा पाटील यांनी स्वागत केले. श्रीनिवास रेड्डी यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. तत्पूर्वी एपीएमसी आवारात एफपीओ संस्थेचे उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शिवशंकर जोल्लले पब्लिक स्कूल येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद् घाटनही त्यांनी केले.
आमदार दुर्योधन ऐहोळे, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे सभापती सद्दाम नगारजी, ज्योतीप्रसाद जोल्ले, एपीएमसी अध्यक्ष अमित साळवे, विश्वनाथ कमते, पी. एस. मोरे, आनंदा यादव, राजू कानडे, कृषी अधिकारी एस. एस. पाटील, नंदिनी कुमारी, एल. एस. दुडगी एच.डी. कोळेकर, जिलानी मोकाशी मंजुनाथ जनमट्टी, सिद्धू नराटे, दिलीप चव्हाण, पवन पाटील, रामगोंडा पाटील, पप्पू पाटील, समीत सासणे, प्रणव मानवी, राजू गुंदेशा, संतोष सांगावकर यांच्या मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.