औरंगाबाद : १० नक्षलवाद्यांचा खात्मा; एस.पी. कलवानिया यांना दुसऱ्यांदा ‘शौर्य’ | पुढारी

औरंगाबाद : १० नक्षलवाद्यांचा खात्मा; एस.पी. कलवानिया यांना दुसऱ्यांदा 'शौर्य'

औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत दहा जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया हे सलग दुसऱ्यांदा शौर्य पदकाचे मानकरी ठरले. पहिली चकमक 18 ऑक्टोबर 2020 रोजी किसनेली गावाजवळील जंगलात तर दुसरी 29 मार्च 2021 रोजी उत्तर गडचिरोलीतील खोबरामेंढा घनटाद जंगलात झाली होती. दोन्ही ठिकाणी पाच-पाच नक्षलवाद्यांना टिपण्यात त्यांना यश आले होते.

कलवानिया हे सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या काळात गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) म्हणून कार्यरत होते. 29 मार्च 2021 रोजी सी-60 कमांडो पथक त्यांच्या नेतृत्त्वात उत्तर गडचिरोलीतील खोबरामेंढा घनटाद जंगलात नक्षल विरोधी सर्च ऑपरेशन सुरु केले. तेव्हा तेथे दबा धरून बसलेल्या 80 ते 90 नक्षलवाद्यांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.

कलवानिया यांच्या आदेशाने सी-६० कमांडोंनी प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. नक्षलवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिले. जवळपास आठ ते नऊ तास चाललेल्या चकमकीनंतर नक्षलींनी माघार घेऊन पळ काढला. त्यानंतर सर्च ऑपरेशन राबविले असता पाच नक्षलवाी मृतावस्थेत तर एक जीवंत आढळला होता. पोलिसांनी मोठया प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा, बॉम्ब, स्फोटके व ईतर नक्षली साहित्य जप्त केले होते. यात कलवानिया यांच्यासह तीन सी-६० कमांडो जखमी झाले होते. कलवानिया यांनी स्वत: जखमी असून जवानांना आत्मविश्वास देत ऑपरेशन सुरु ठेवले. हे संपूर्ण ऑपरेशन तब्बल तीन दिवस सुरु होते. नक्षल चळवळीला हादरा देणारी साहसी कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींनी सलग दुसऱ्यांदा एस.पी.मनिष कलवानिया यांना शौर्य पदक जाहीर केले आहे.

डीवाएसपी भवर यांनाही पदकाचा मान

सलग दुसऱ्यांदा शौर्य पदकाचे मानकरी ठरलेले मनिष कलवानिया यांना गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित व दुर्गम क्षेत्रात दोन वर्षे अतिउत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयने आंतरिक सुरक्षा पदकही जाहीर केले आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरिक सुरक्षा पदक जाहीर केले आहे. त्यांनी दोन वर्षे कुरुखेरा (गडचिरोली) येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

गोकूळ वाघ यांना राष्ट्रपती पदक

32 वर्षे उत्त्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत सहायक उपनिरीक्षक गोकूळ पुंजाजी वाघ यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यांना 421 बक्षिसे व आठ प्रशंसापत्रे मिळालेली आहेत. 2017 मध्ये त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्हदेखील मिळालेले आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, पोलिस निरीक्षक दादाराव सिनगारे, अविनाश आघाव, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा;

Back to top button