औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा: शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यायची गरज नाही. त्यासाठी संजय राऊत हेच पुरेसे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरात बुडवली, त्याला आम्ही बाहेर काढतोय, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केला. येत्या काळात भाजपमध्ये अनेक मोठमोठे नेते येणार आहेत. प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला. (Chandrashekhar Bawankule)
बावनकुळे हे गुरुवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे नेते अमित देशमुख भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, अनेक जण भाजपमध्ये येतील, यादीत बरीच मोठमोठी नावे आहेत, फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचे आहे. येत्या काळात प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील. एवढेच नाही, महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील.बावनकुळे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद जाते की राहते, हे निवडणूक आयोग ठरवेल, त्याबाबत वाद आयोगात सुरू आहे, आमच्यात नाही, असेही ते म्हणाले. भाजपकडून शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. त्याबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, की शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यायची गरज नाही, त्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरात बुडवली, त्याला भाजप बाहेर काढत आहे. आम्ही विकासात्मक काम करतो. मोदी विकासासाठी येणार आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते शिवसेनेसाठी पुरेसे आहोत. त्यांच्याकडील सगळेच लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.
• उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुणीच राहू शकत नाही. त्यांच्या पक्षाचेच आमदार, खासदार त्यांना सोडून गेले. दूसरे पक्ष का राहतील? त्यांना आपले स्वतःचे सांभाळता आले नाही, ते काय प्रकाश आंबेडकरांना सांभाळतील? युती चालविण्यासाठी जे बळ लागते, जी भूमिका लागते, ती उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला आहे. त्यांना हे निश्चित कळते की उद्धव ठाकरे हे निवडणुकीपुरते जवळ येतील
आणि पुन्हा त्यांना वेळच राहणार नाही.
हेही वाचा